पुणे, 6 ऑक्टोबर 2023: संदीप किर्तने टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित भारती विद्यापीठ एमएसएलटीए डेक्कन जिमखाना अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात स्वानिका रॉय हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. मुलांच्या गटात एकेरीत शौनक सुवर्णा याने तर, दुहेरीत नमिश हुड व आर्यन किर्तने यांनी विजेतेपद पटकावले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या अंतिम फेरीत एकेरीत मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित शौनक सुवर्णा याने अव्वल मानांकित वरद उंद्रेचा 4-6, 3-1 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. हा सामना 1तास 32मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड केला. वरदने शौनकची दुसऱ्या, चौथ्या, आठव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत 6-4 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये शौनकने तिसऱ्या गेममध्ये वरदची सर्व्हिस ब्रेक केली व 3-1 अशी आघाडी मिळवली. 3-1 अशी सामन्यात स्थिती असताना वरदने सामन्यातून माघार घेतली. शौनक हा रेसिडेन्सी टेनिस अकादमीत प्रशिक्षक निलेश सावंत यांच्या मार्गर्शनाखाली सराव करतो.
मुलींच्या गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित स्वानिका रॉय हिने दुसऱ्या मानांकित आरोही देशमुखचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 20मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये स्वानिकाने आरोहीची दुसऱ्याच गेममध्ये सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये स्वानिकाने वर्चस्व राखत आरोहीविरुध्द हा सेट 6-2 असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये देखील पिछाडीवर असलेल्या आरोहीला स्वानिकाने कमबॅक करण्याची फारशी संधी दिली नाही. हा सेट स्वानिकाने आरोही विरुध्द 6-3 असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. स्वानिका ही अभिनव इंग्लिश मिडीयम शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून एम टेनिस अकादमीत प्रशिक्षक केतन धुमाळ यांच्या मार्गर्शनाखाली सराव करते.
दुहेरीत अंतिम फेरीत मुलींच्या गटात स्वानिका रॉय व श्रावी देवरे याअव्वल मानांकित जोडीने स्वरा जावळे व काव्या देशमुख यांचा 6-4, 6-1 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. मुलांच्या गटात नमिश हुड व आर्यन किर्तने यांनी विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भारती विद्यापीठचे सचिव व माजी राज्य मंत्री विश्वजीत कदम, भारती विद्यापीठ मेडिकल फाऊंडेशन(हेल्थ सायन्स) च्या कार्यकारी संचालिका अस्मिता जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अश्विन गिरमे, पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे, पीएमडीटीएचे सह सचिव हिमांशु गोसावी, स्पर्धा संचालक संदीप किर्तने, स्पर्धा संयोजन सचिव डॉ.विक्रांत साने, एमएसएलटीए सुपरवायझर प्रविण झिटे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी):
मुले: शौनक सुवर्णा(महा)(2)वि.वि.वरद उंद्रे(महा)(1)4-6, 3-1 सामना सोडून दिला;
मुली: स्वानिका रॉय(महा)(1)वि.वि.आरोही देशमुख(महा)(2)6-2, 6-3;
दुहेरी:
मुले: नमिश हुड/आर्यन किर्तने पुढे चाल वि.वरद उंद्रे/स्मित उंद्रे(1)
मुली: स्वानिका रॉय/श्रावी देवरे (1) वि.वि.स्वरा जावळे/काव्या देशमुख(2)6-4, 6-1.
महत्वाच्या बातम्या –
एमटी आयटीएफ एस 400 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेस आजपासून सुरुवात
CWC 2023: चोकर्सचा शिक्का पुसण्यासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज, पहिल्या सामन्यात श्रीलंकेचे आव्हान