टी२० विश्वचषकात बुधवारी (३ नोव्हेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंड आणि स्कॉटलंड या दोन सांघात आमना सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने स्कॉटलंडला १६ धावांनी नमवले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात स्कॉटलंड संघ १५६ धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणामी स्कॉटलंडला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने मिळवलेल्या या विजयासह संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडने या विजयासह उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग आणखी सोपा केला आहे.
सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडने मर्यादित २० षटकांमध्ये पाच विकेट्सच्या नुकसानावर १७२ धावा केल्या आणि स्कॉटलंडला विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य दिले. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने ५६ चेंडूत सहा चौकार आणि सात षटकाराच्या मदतीने ९३ धावांची महत्वाची खेळी केली. संघाचा दुसरा सलामीवीर डॅरिल मिचेल अवघ्या १३ धावा करू बाद झाला.
कर्णधार केन विलियम्सन त्याचे खातेही न उघडता आणि संघाची धावसंख्या ३५ असताना बाद झाला. तसेच चौथ्या क्रमांकावर आलेला डेविड कॉनव्हेही (१) काही कमाल करू शकला नाही. पण, गप्टिल आणि ग्लेन फिलीप्सने (३३) संघासाठी १०५ धावांची भागीदारी केली आणि डाव सावरला. स्कॉटलंडच्या ब्रैड व्हीलने या दोघांना एकापाठोपाठ सलग चेंडूवर बाद केले.
न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडचे सलामीवीर काइल कोएत्जर (१७) आणि जॉर्ज मुन्सेने (२२) यांनी पहिल्या विकेटसाठी २१ धावांची भागीदारी केली. डावच्या पाचव्या षटकात मॅथ्यू क्रासने सलग पाच चौकार मारले आणि न्यूझीलंडची चिंता वाढवली होती. मुन्से आणि क्रॉस यांनी दुसऱ्या विकेट्सासाठी ४५ धावा केल्या. फिरकी गोलंदाज ईश सोढीने मुन्सेला बाद करून या दोघांची जोडी तोडली. त्यानंतर न्यूझीलंडने सामन्यात वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली होती. क्रॉसने २७ आणि रिची बेरिंग्टनने संघासाठी २० धावा केल्या.
गोलंदाजांचा विचार केला तर, न्यूझीलंडासाठी ट्रेंट बोल्टने चार षटकात २९ धावा दिल्या आणि २ विकेट्स मिळवल्या. तसेच न्यूझीलंडच्या ईश सोढीने चार षटकात तब्बल ४२ धावा दिल्या आणि दोन विकेट घेऊ शकला. याव्यतिरिक्त न्यूझीलंडसाठी टिम साउदीने २४ धावा देऊन १ विकेट घेतला. स्कॉटलंडसाठी ब्रेड विल ४० आणि सफयान शरिफने २८ धावा देऊन प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त स्कॉटलंडच्या मार्क वाटने १३ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
स्कॉटलंडच्या यष्टीरक्षकाची गंमतीदार कोपरखळी; गोलंदाजाला म्हणाला, ‘संपूर्ण भारत तुझ्या पाठीशी’
‘बीसीसीआयने आता मोठ्या खेळाडूंचे भविष्य ठरवण्याची वेळ आली आहे’, कपिल देव भडकले
एकमेवाद्वितीय विराट! बनला क्रिकेट इतिहासातील आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार