टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी हा सामना जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं असेल. त्यामुळे या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल दिसू शकतात.
या टी20 विश्वचषकात फिरकीपटू कुलदीप यादवला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. तो न्यूयॉर्कमध्ये एकदाही खेळला नाही. मात्र, आता टीम इंडियाला पुढील सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळायचे आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध बार्बाडोस येथे होणार आहे. कॅरेबियन भूमीवर फिरकीपटूंना खूप मदत मिळते. त्यामुळेच भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतो. असं झाल्यास कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. कुलदीपला चेंडू वळवण्याची कला चांगलीच अवगत आहे. यामुळे त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.
कुलदीप यादवला संघात खेळवल्यास मोहम्मद सिराजला वगळलं जाऊ शकतं. या विश्वचषकात सिराजची कामगिरी काही खास झालेली नाही. त्याला 3 सामन्यांत फक्त एकच विकेट मिळाली आहे. त्यामुळेच त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवचा समावेश केला जाऊ शकतो. वेगवान गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांना वगळण्याचा प्रश्नच नाही.
टीम इंडिया सुपर-8 मध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेशशी मुकाबला करणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला किमान दोन सामने जिंकावे लागतील. तसेच आपला नेट रनरेटही चांगला ठेवावा लागेल. गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. टीम इंडियाला अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाकडून कडवी टक्कर मिळू शकते. याशिवाय बांग्लादेशच्या संघाचा बेभरवश्याचा खेळ पाहता, त्यांनाही हलक्यात घेणं भारतीय संघाला परवडणारं नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
बांग्लादेशच्या गोलंदाजाची नेपाळच्या कर्णधाराशी धक्काबुक्की, BAN vs NEP सामन्यात मोठा राडा!
सुपर-8 मध्ये भारताचा सामना कोणत्या संघासोबत कधी होणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
नेपाळला धूळ चारत बांग्लादेश सुपर 8 साठी पात्र, नेदरलँडचं स्वप्न भंगलं