क्रिकेटविश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा क्रिकेटपटू वेंकटेश अय्यर याने नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. अलीकडेच वेंकटेश अय्यरचा श्रुती रघुनाथन हिच्यासोबत साखरपुडा झाला. क्रिकेटपटूने श्रुतीसोबतचा फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. वेंकटेशने याची माहिती देताच त्याच्या पोस्टवर चाहत्यांसोबतच भारतीय क्रिकेटपटूंनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत त्याचे अभिनंदन केले आहे.
वेंकटेश अय्यरचा साखरपुडा
वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत वेंकटेशने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे, तर त्याची होणारी पत्नी श्रुती रघुनाथन (Shruti Ragunathan) जांभळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. त्याने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये एंगेज या हॅशटॅगचा समावेश करत लिहिले की, “आयुष्यातील पुढील चॅप्टरच्या दिशेने.”
View this post on Instagram
वेंकटेशच्या या पोस्टवर अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी त्याचे अभिनंदन केले. त्यात अर्शदीप सिंग, आवेश खान, मनदीप सिंग, श्रेयस अय्यर, नमन ओझा आणि युझवेंद्र चहल यांचाही समावेश आहे. तसेच, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने कमेंट करत लिहिले की, “खूप खूप अभिनंदन.” याव्यतिरिक्त भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यानेही कमेंट करत लिहिले की, “भाऊ अभिनंदन.”
कोण आहे वेंकटेशची होणारी पत्नी?
श्रुतीविषयी जास्त माहिती समोर आली नाहीये. तिचं इंस्टाग्राम अकाऊंटही खासगी आहे. रिपोर्ट्सनुसार, श्रुतीने तिचे बी कॉमचे शिक्षण पीएसजी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि सायन्स कॉलेजमधून पूर्ण केले आहे. तसेच, तिने एनआयएफटीमधून फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची पदवी घेतली आहे. सध्या ती बंगळुरूतील लाईफस्टाईल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मर्चंडाईज प्लॅनर म्हणून काम करत आहे.
वेंकटेश अय्यरची कारकीर्द
मध्यप्रदेशच्या इंदोर येथे जन्मलेल्या 28 वर्षीय वेंकटेश अय्यर याने भारताकडून 2 वनडे आणि 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. तो आक्रमक फलंदाजीसोबतच मध्यमगती वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने वनडेत भारताकडून 24 धावा केल्या आहेत. तसेच, टी20त त्याने 33.25च्या सरासरीने 133 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याला टी20त 5 विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये धमाल
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत वेंकटेश कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. त्याने 36 सामने खेळताना आतापर्यंत 28.12च्या सरासरीने आणि 130.25च्या स्ट्राईक रेटने 956 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. यात त्याला 3 विकेट्स घेण्यात यश आले आहे. तसेच, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्यप्रदेशकडून खेळताना त्याने 12 प्रथम श्रेणी सामन्यात 32.50च्या सरासरीने 585 धावा केल्या आहेत. यामध्ये अर्धशतकांचाही समावेश आहे. (team india cricketer venkatesh iyer engaged posted a wonderful photo know his future wife)
हेही वाचा-
पाकिस्तान संघाच्या गोलंदाजी विभागाची ताकद वाढणार! 2 माजी दिग्गजांवर सोपवली मोठी जबाबदारी, वाचा कोण आहेत ते
वर्ल्डकपनंतर वॉर्नरने जिंकले 140 कोटी भारतीयांचे हृदय, मोठ्या मनाने माफी मागत म्हणाला…