---Advertisement---

भारत ७८ वर ऑल आऊट, चिंता नको! ही बातमी वाचून भारतीय चाहत्यांच्या जिवात जीव येईल

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 10:35 AM
---Advertisement---

लॉर्ड्स कसोटीतील दणदणीत विजयानंतर लीड्स येथील हेडिंग्ले स्टेडियमवर चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची दयनीय अवस्था झाली आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे भारताची फलंदाजी फळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. केवळ ४०.४ षटके खेळत भारताचा आख्खा संघ अवघ्या ७८ धावांवर सर्वबाद झाला. पहिल्याच दिवशी (२५ ऑगस्ट) पहिल्याच डावात भारतीय खेळाडूंच्या या निराशाजनक कामगिरीने चाहत्यांची चिंता वाढवली आहे. असे असूनही भारतीय संघाच्या विजयाच्या आशा अजूनही जिवंत आहेत.

भारतीय संघाने कसोटीच्या पहिल्या डावात कमी धावा केल्यानंतरही पुढे दमदार पुनरागमन करत विजय मिळवल्याची उदाहरणे आहेत. २००४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात झालेल्या कसोटी सामन्यात भारताने अविश्वसनीय विजय मिळवला होता. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ १०४ धावांवरच सर्वबाद झाला होता. मात्र पुढे दमदार पुनरागमन करत संघाने १३ धावांनी सामना खिशात घातला होता.

इतकेच नव्हे तर, १५२, १५६, १७९, १८७ अशा धावसंख्येवर संपूर्ण संघ बाद झाल्यानंतरही भारताने सामने जिंकले आहेत.

याखेरीज फलंदाजीस पोषक अशा हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंडने खेळलेला अखेरचा सामना बेन स्टोक्सच्या कामगिरीमुळे अविस्मरणीय ठरला आहे. इंग्लंडने २०१९ साली ऍशेसमधील तिसरा सामना या मैदानावर खेळला होता. या सामन्यात इंग्लंड संघ पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या १७९ धावांना प्रतिउत्तर देताना केवळ ६७ धावांवर सर्वबाद झाला होता.

असे असतानाही दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला २४६ धावांवर रोखत ३५९ धावांचे भलेमोठे आव्हान पार करत इंग्लंडने विजय मिळवला होता. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात बेन स्टोक्सने कमालीची कामगिरी केली होती. त्याने १३५ धावांची नाबाद खेळी करताना अखेरच्या विकेटसाठी जॅक लीचबरोबर नाबाद ७६ धावांची भागीदारी रचली होती. त्यामुळे इंग्लंडने हा सामना केवळ १ विकेटने जिंकला होता.

इंग्लंडची या सामन्यातील पहिल्या डावातील धावसंख्या (६७ धावा) भारताच्या (७८ धावा) तुलनेत फारच कमी होती. तरीही त्यांनी सामना जिंकण्याची अद्भुत कामगिरी केली होती. त्यामुळे भारतीय संघाच्या विजयाच्या आशा अजूनही जिवंत आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यासाठी भारताच्या गोलंदाजांना अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडला कमीत कमी धावसंख्येवर रोखावे लागणार आहे. त्यानंतर बचावात्मक खेळी करत मोठ्या धावा फलकावर नोंदवत विजय निश्चित करण्याची जबाबदारी संघाच्या फलंदाजांवर असेल.

अशात भारतीय संघ पहिल्या दिवशीच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर उर्वरित ४ दिवसांत कशाप्रकारे पुनरागमन करेल?, हे पाहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आम्ही आमच्या चुकांमधून शिकू आणि…,’ पहिल्या दिवशीच्या दुर्देवी प्रदर्शनानंतरही पंतला पुनरागमनाचा विश्वास

इंग्लंडच्या प्रेक्षकांचा पुन्हा उर्मटपणा, बाउंड्रीवरील सिराजला छेडले; गोलंदाजानेही त्यांची चांगलीच जिरवली

काय सांगताय? अवघ्या ६ चेंडूत भारताचे ४ गडी बाद, कोण होते ते शिलेदार; वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---