---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाची दशकपूर्ती! आजच्याच दिवशी टीम इंडियाने उंचावलेली अखेरची आयसीसी ट्रॉफी

---Advertisement---

शुक्रवारी (23 जून) भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेली अखेरच्या आयसीसी ट्रॉफी म्हणजेच 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय पुरुष क्रिकेट संघाने जिंकलेल्या सहा आयसीसी ट्रॉफींपैकी ही सर्वात अखेरची ट्रॉफी ठरली. आज आपण या आयसीसी ट्रॉफी विजयाच्या आठवणींना उजाळा देऊया.

भारताला टी20 व वनडे विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार म्हणून ओळख असलेल्या एमएस धोनी याच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता. 2002 मध्ये भारतीय संघाने सौरव गांगुलीच्या नेतृत्वात ही स्पर्धा जिंकली होती. मात्र, त्यावेळी अंतिम सामन्यात पाऊस आल्याने भारत व श्रीलंकेला संयुक्त विजेते घोषित करण्यात आलेले. तर, 2009 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयश आलेले.

भारतीय संघ मुरली विजय व शिखर धवन या सलामीवीरांसह चॅम्पियन्स ट्रॉफीत सामील झालेला. मात्र, सराव सामन्यांमध्ये विजय अपयशी ठरल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शिखरसह रोहित शर्मा सलामीला आला. धोनीचा हा निर्णय कमालीचा यशस्वी ठरला व त्यांनी पहिल्याच सामन्यात शतकी सलामी दिली. भारतीय संघाने साखळी फेरीत दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली.

अंतिम फेरीत भारतीय संघाला यजमान इंग्लंडशी झुंज द्यायची होती. पावसामुळे तब्बल पाच तासांचा खेळ वाया गेल्यानंतर हा अंतिम सामना प्रत्येकी 20 षटकांचा करण्यात आला. इंग्लंडने शानदार गोलंदाजी करत भारतीय संघाला या सामन्यात 129 धावांवर रोखले. भारतासाठी विराट कोहलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड मजबूत अवस्थेत दिसून येत होता. मात्र, अठराव्या षटकात ईशांत शर्मा याने जम बसलेल्या रवी बोपारा व ओएन मॉर्गन यांना बाद केले. त्यानंतर पुढच्या षटकात रवींद्र जडेजा याने बटलरला बाद करून भारताचा विजय निश्चित केला. अखेरच्या षटकात रविचंद्रन अश्विन याने अखेरच्या जोडीला रोखत भारताला 5 धावांनी विजय मिळवून दिला.

यासह धोनी हा आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा पहिला खेळाडू व एकमेव कर्णधार बनलेला. यानंतर भारतीय संघाने आतापर्यंत नऊ आयसीसी स्पर्धांमध्ये भाग घेतला ज्यामध्ये विजय मिळवण्यात संघाला अपयश आले आहे.

(Ten Years Of ICC Champions Trophy 2013 Victory Last Trophy Of India Under MS Dhoni)

महत्वाच्या बातम्या-
तब्बल 15 महिन्यांनंतर समोर आले वॉर्नच्या मृत्यूचे कारण! रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे 
दिग्गज क्रिकेटपटू का करत नाहीत निवडसमिती सदस्यपदासाठी अर्ज? समोर आले मोठे कारण 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---