2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत करत पाकिस्तान संघाने विजेतेपद मिळवले होते. हे विजेतेपद मिळवण्यात पाकिस्तानकडून 29 वर्षीय फलंदाज फकार जमानने मोठा वाटा उचलला होता. त्याने 18 जून 2017 ला भारत विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडलेल्या अंतिम सामन्यात शतकी खेळी केली होती.
विशेष म्हणजे त्याने या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच भारताविरुद्ध अंतिम सामना खेळण्याआधी तो फक्त तीन वनडे सामने खेळला होता. यात त्याने दोन अर्धशतके केली होती. पण तो भारताविरुद्ध अंतिम सामन्यात केलेल्या शतकी खेळीने अचानक प्रकाशझोतात आला.
पण फकारने म्हटले आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नो बॉल टाकल्याने तो सुदैवी ठरला होता आणि त्या नोबॉल नंतर केलेल्या शतकामुळे तो एवढा प्रसिद्ध झाला.
या अंतिम सामन्यात फकार 3 धावांवर खेळत असताना बुमराहच्या एका चेंडूवर त्याने यष्टीरक्षक एमएस धोनीकडे झेल दिला होता. मात्र बुमराहचा तो चेंडू नो बॉल असल्याने फकारला जीवदान मिळाले होते. हे जीवदान नंतर भारतासाठी चांगलेच महागात पडले होते.
या नोबॉलबद्दल बोलताना फकार म्हणाला, ‘त्या नो बॉलने मला घडवले. मला अंतिम सामन्याआधी स्वप्न पडले होते की मी नोबॉलवर बाद झालो आहे आणि ते खरे घडले. सुरुवातीला मी निराश झाला होतो. कारण मी माझ्या पालकांना वचन दिले होते की मी सामन्यात चांगली कामगिरी करेल.’
‘मी सुदैवी होतो आणि त्या शतकानंतर मी प्रसिद्ध झालो. पण त्या प्रसिद्धीबरोबर जबाबदारीही आली. मी त्यानंतर परिपक्व झालो. आता मला खेळताना माझ्या भूमीकेचे महत्त्व समजले आहे. विश्वचषकात खेळताना हे माझे पहिले प्राधान्य असणार आहे.’
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने 106 चेंडूत 114 धावा केल्या होत्या. हे त्याचे पहिलेच वनडे शतक होते. या सामन्यात पाकिस्तानने त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 338 धावांची धावसंख्या उभारली होती आणि नंतर भारताला 158 धावांवर रोखत 180 धावांनी मोठा विजय मिळवला होता.
या खेळीने फकारला एका रात्रीत स्टार केले. त्याने त्यानंतर मागे वळून न पाहता पाकिस्तान संघातील जागाही पक्की केली आणि आता पाकिस्तानच्या विश्वचषकासाठीच्या संघातही स्थान मिळवले आहे.
फकारने आत्तापर्यंत पाकिस्तानकडून 36 वनडे खेळले असून 51.31 च्या सरासरीने 1642 धावा केल्या आहेत. तसेच तो वनडेमध्ये द्विशतक करणारा पाकिस्तानचा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने मागीलवर्षी झिम्बाब्वेविरुद्ध हे द्विशतक झळकावले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–Video: चेल्सीच्या स्टार फुटबॉलपटूने विराट कोहलीच्या टीम इंडियाला दिल्या खास शुभेच्छा
–‘यूनिवर्स बॉस’ गेलने या दिग्गज खेळाडूला केले २०२३ चा विश्वचषक खेळण्यासाठी प्रभावित…
–एका विश्वचषकात या संघाने केले आहेत सर्वाधिक शतके, टीम इंडिया आहे या स्थानावर






