कसोटी चॅम्पियनशीपमधील टीम इंडियाचा पहिला पराभव; जाणून घ्या किती आहेत गुण

वेलिंग्टन।न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात बेसिन रिझर्व स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आज(24 फेब्रुवारी) 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

ही मालिका मागीलवर्षी 1 ऑगस्टपासून सुरु झालेल्या कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे. तसेच कसोटी चॅम्पियनशिप सुरु झाल्यापासून भारताचा हा पहिलाच पराभव झाला आहे.

भारताची ही आत्तापर्यंत कसोटी चॅम्पियनशिपमधील चौथी मालिका आहे. तसेच भारताने आत्तापर्यंत कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 8 सामने खेळले आहेत. त्यातील 7 सामने भारताने जिंकले आहेत. तर आज भारताला पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.

तसेच भारताला आज पराभव स्विकारावा लागला असल्याने या सामन्याचा एकही गुण मिळालेला नाही. पण असे असले तरी भारतीय संघ मागील 7 विजयांमुळे 360 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे.

तसेच आज न्यूझीलंडने विजय मिळत कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 60 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे आता त्यांचे 6 सामन्यात 120 गुण झाले असून त्यांनी श्रीलंकेला मागे टाकत कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत 5 वा क्रमांक मिळवला आहे. श्रीलंका 80 गुणांसह सहाव्या स्थानावर गेली आहे.

या कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत भारतापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांचे 10 सामन्यात 296 गुण आहेत. तसेच तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे इंग्लंड आणि पाकिस्तान आहे. इंग्लंडचे 146 गुण आहेत. तर पाकिस्तानचे 140 गुण आहेत.

न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटीनंतर कसोटी चॅम्पियशीपची गुणतालिका-

Screengrab: espncricinfo.com

 

असे दिले जातात कसोटी चॅम्पियनशीपमध्ये गुण – 

ही चॅम्पियनशीप स्पर्धा आयसीसीचे कसोटी सदस्य असणाऱ्या 12 देशांपैकी 9 देशांच्या संघात होत आहे. यामध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या 9 देशांचा समावेश आहे.

तसेच 9 संघांना प्रत्येकी 8 प्रतिस्पर्ध्यांपैकी 6 संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळाव्या लागणार आहे. यामध्ये तीन मालिका घरच्या मैदानावर तर तीन मालिका परदेशात खेळायच्या आहेत. या मालिका 2 ते 5 सामन्यांच्या असतील.

या चॅम्पियशीपमध्ये होणाऱ्या प्रत्येक मालिकेसाठी एकूण 120 गुण असतील. म्हणजेच जर दोन सामन्यांची मालिका असेल तर या मालिकेतील एक सामना जिंकणाऱ्या संघाला 60 गुण मिळतील.

पण सामना जर अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाला प्रत्येकी 20 गुण आणि जर सामन्यात बरोबरी झाली तर दोन्ही संघाला प्रत्येकी 30 गुण दिले जातील. पराभूत होणाऱ्या संघाला एकही गुण मिळणार नाही.

जर मालिका 3 सामन्यांची झाली तर एका सामन्यात जिंकणारा संघ 40 गुण मिळवेल. तर अनिर्णित झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 13 गुण आणि बरोबरी झाली तर दोन्ही संघांना प्रत्येकी 20 गुण दिले जातील.

या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये साखळी फेरीनंतर ज्या दोन संघांचे सर्वाधिक गुण असतील त्या दोन संघात जून 2021 मध्ये लॉर्ड्सवर अंतिम सामना पार पडेल.

कसोटी चॅम्पियनशिपमध्ये असे मिळणार गुण – 

Screengrab: icc-cricket.com

 

You might also like