क्रिकेटला जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून आजतागायत क्रिकेटमध्ये अनेक क्रांतिकारी बदल घडले आहेत. पहिले अमर्यादित काळासाठी, निकाल लागेपर्यंत खेळले जाणारे क्रिकेट आज दहा षटकांच्या प्रकारापर्यंत पोहोचले आहे. प्रत्येक गोष्ट काळानुरूप बदलत जाते याला क्रिकेटही अपवाद राहिले नाही. काहीसे रटाळ असलेले क्रिकेट आज दोन तासाच्या खेळात लोकांना भरपूर मनोरंजन देते.
क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या रोज रोज घडत नाहीत. त्यापैकी एक म्हणजे सामना टाय होणे. दोन्ही संघाची धावसंख्या समान झाल्यानंतर, सामने टाय होतात. आता सुधारणा करून, सामना टाय झाला तर तो सुपर ओव्हरमध्ये जाऊन त्यातून सामन्याचा विजेता मिळतो. अगदी, २०१९ विश्वचषकाचा अंतिम सामना देखील टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये गेल्यानंतर जगाला नवीन जगज्जेता इंग्लंड मिळाला होता. टी२० व वनडेमध्ये असे सामने अधीमधी टाय होत असतात. मात्र, कसोटीत टाय सामना मिळणे म्हणजे, महाकठीण गोष्ट.
१८७७ ला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला गेल्यापासून आजवर फक्त दोन कसोटी सामने टाय झाले आहेत. १९६० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज तर १९८६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत असे हे सामने होते. त्यापैकी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या टाय सामन्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
१९८६ चर्या सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ ऍलन बॉर्डर यांच्या नेतृत्वात भारतात दाखल झाला. भारतीय संघाचे नेतृत्व विश्वविजयी कर्णधार कपिल देव यांच्या हाती होते. तीन कसोटी व पाच एकदिवसीय सामने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळणार होती. दौऱ्याची सुरुवात आत्ताची चेन्नई म्हणजे त्यावेळच्या मद्रास कसोटीने १८-२२ सप्टेंबर यादरम्यान होणार होती.
चेन्नईच्या उष्ण व उकाड्याच्या वातावरणात ऍलन बॉर्डर यांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरताच, भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी सलग १०० कसोटी सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड बून व जेफ मार्श हे डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले. दोघांनीही सुरुवातीपासून बचावात्मक पवित्रा घेतला. याचवेळी, भारतीय यष्टीरक्षक किरण मोरे यांच्या पोटात वेदना होऊ लागल्याने त्यांना विश्रांती देऊन चंद्रकांत पंडित यांनी यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली.
बून काहीसे आक्रमक होण्याचा प्रयत्न करत होते तर मार्श यांना भारतीय गोलंदाजी खेळण्यास काहीशी अडचण येत होते. अखेरीस, शिवलाल यादव यांनी मार्श यांना वैयक्तिक २२ धावांवर कपिल देव यांच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. मार्श बाद झाले, मात्र त्यानंतर भारताची खरी परीक्षा सुरू झाली. बून व नवीन फलंदाज डीन जोन्स यांनी भारतीय गोलंदाजांना यश लाभू दिले नाही. दोघांनीही धावफलक हलता ठेवला. याच दरम्यान बून यांनी आपले शतक पूर्ण केले. बून-जोन्स जोडी दिवसाअखेर, नाबाद राहणार असे वाटत असतानाच दिवसातील दोन षटके बाकी असताना, चेतन शर्मा यांनी बून यांना बाद केले. बून यांनी १२२ धावांची लाजवाब खेळी साकारली. दिवसाअखेर जोन्स ५८ तर नाईट वॉचमन रे ब्राईट एका धावेवर नाबाद होते.
पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांना फारसे यश मिळाले नाही. मात्र दुसऱ्या दिवशी भारतीय संघ नव्या उमेदीने मैदानात उतरला. पण, डीन जोन्स यांच्या मनात वेगळेच काहीतरी होते. आधी ब्राईट यांच्यासमवेत ७६ तर नंतर कर्णधार बॉर्डर यांच्यासमवेत १८८ धावांची भली मोठी भागीदारी रचली. वैयक्तिक २१० धावांची खेळी करून जोन्स तंबूत परतले. जोन्स यांनी २१० धावांच्या खेळीसाठी, ५०३ मिनिटे मैदानावर थांबत, ३३० चेंडूचा सामना केला. या खेळीत २७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. डाव संपल्यानंतर, जोन्स यांना थकव्यामुळे रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. जोन्स बाद झाल्यानंतर, कर्णधार बॉर्डर सुद्धा आपले शतक पूर्ण करून बाद झाले. दुसरा दिवस संपल्यानंतर, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५५६-६ अशी होती.
तिसऱ्या दिवशी लवकरच ऑस्ट्रेलियाने ५७४ धावांवर आपला डाव घोषित केला. भारताकडून शिवलाल यादव यांनी सर्वाधिक चार बळी मिळवले. ऑस्ट्रेलियाच्या डोंगराएवढ्या धावसंख्येला प्रत्युत्तर देण्यासाठी के श्रीकांत व सुनील गावसकर ही अनुभवी जोडी मैदानात उतरली. श्रीकांत यांनी पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यांनी अवघ्या ५५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने गावसकर नेहमीप्रमाणे शांतचित्ताने खेळत होते. संघाच्या ६२ धावा झाल्या असताना गावसकर यांना मॅथ्यूज यांनी बाद केले. ६२ धावांच्या भागीदारीत गावसकरांचे योगदान फक्त ८ धावांचे होते. गावसकर बाद होताच, अचानक डावाचा नूर पालटला. मोहिंदर अमरनाथ धावबाद झाले व श्रीकांत मॅथ्यूज यांच्या चेंडूवर रिची यांच्या हाती झेल देत बाद झाले. ६२-० या धावसंख्येवरून अचानक डाव ६५-३ असा घसरला.
आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर, रवी शास्त्री व युवा मोहम्मद अझरुद्दीन यांनी डाव सावरला. दोघांनी ७७ धावांची भागीदारी उभी केली. अझरुद्दीन अर्धशतक पूर्ण होताच ब्राईट यांच्या गोलंदाजीवर बाद झाला. दुसरा युवा खेळाडू मुंबईकर चंद्रकांत पंडित हा रवी शास्त्री यांच्या साथीला आला. दोन्ही मुंबईकरांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा यशस्वी सामना करत, भारताला सामन्यात जिवंत ठेवले. शास्त्री ६२ व पंडित ३५ धावा करून पाठोपाठ बाद झाले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा, कर्णधार कपिल देव ३३ व चेतन शर्मा १४ धावांवर खेळत होते.
चौथ्या दिवशी, कपिल यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. आधी चेतन शर्मा यांच्यासोबत ८५ व शिवलाल यादव यांच्यासमवेत ५७ धावांची वेगवान भागीदारी केली. कपिल देव भारताकडून बाद होणारे अखेरचे फलंदाज ठरले. तत्पुर्वी त्यांनी, १३८ चेंडूत धुवाधार ११८ धावा फटकावून भारताची धावसंख्या ३९७ अशी सन्मानजनक करून ठेवली होती.
चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव आक्रमक पद्धतीने सुरू केला. सर्व फलंदाजांच्या थोड्या-थोड्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने ५० षटकात पाच गडी गमावत १७० धावांवर आपला डाव घोषित केला. डेव्हिड बून यांनी सर्वाधिक ४९ धावांचे योगदान दिले. अखेरच्या दिवशी भारतासमोर विजयासाठी ३४८ धावांचे लक्ष होते.
चेपॉकच्या खेळपट्टीवर अखेरच्या दिवशी फलंदाजी करणे म्हणजे महाकठीण काम समजले जात. मात्र, सुनील गावसकर व स्थानिक खेळाडू असलेल्या श्रीकांत यांनी कोणतेही दडपण न घेता नेटाने फलंदाजी सुरू केली. पहिल्या डावाप्रमाणेच श्रीकांत यांनी यावेळी देखील आक्रमक रूप धारण केले. जलदगतीने ३९ धावा करत ते बाद झाले. पहिल्या डावात आलेले अपयश धुऊन काढत, मोहिंदर अमरनाथ यांनी अर्धशतक पूर्ण केले. गावसकर-अमरनाथ जोडीने दुसऱ्या गड्यासाठी १०३ धावांची भागीदारी केली. अमरनाथ बाद झाल्यानंतर, गावसकर यांनी अझरुद्दीनला साथीला घेत डाव पुढे नेला. गावसकर आपले शतक पूर्ण करणार असे वाटत असताना, वैयक्तिक ९० धावांवर ब्राइट यांच्या गोलंदाजीवर डीन जोन्स यांच्याकडे झेल देत तंबूत परतले.
गावसकरांनंतर आलेल्या चंद्रकांत पंडित यांनी अझरूद्दीनची साथ देत सामन्यात वाटचाल सुरू ठेवली. पण, अझरुद्दीन व कर्णधार कपिल देव दोन धावांच्या अंतरात बाद झाल्याने, सामन्याला नाटकीय वळण आले. चंद्रकांत पंडित यांच्या अवघ्या ३७ चेंडूतील ३९ धावांच्या खेळीने सामन्यात रंग भरला.
पंडित बाद झाले तेव्हा, भारताला विजयासाठी ५७ धावांची गरज होती. मैदानावर दोन्ही अष्टपैलू रवी शास्त्री व चेतन शर्मा उपस्थित होते. दोघांनी झटपट ४० धावा जोडत सामना भारताच्या बाजूने झुकवला. त्याचवेळी, फिरकीपटू रे ब्राईट यांनी चेतन शर्मा, किरण मोरे व शिवलाल यादव यांना नियमित अंतराने बाद करत सामान रोमांचक बनविला. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी चार धावा तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी एक गडी बाद करणे आवश्यक होते. ऑस्ट्रेलियाकडून सामन्यातील सर्वात यशस्वी गोलंदाज ग्रेग मॅथ्यूज गोलंदाजी करणार होते.
पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी रवी शास्त्री तयार झाले. मॅथ्यूज यांनी पहिला चेंडू निर्धाव टाकला. दुसऱ्या चेंडूवर शास्त्री यांनी जोरदार प्रहार करत दोन धावा काढल्या. आता भारताला विजयासाठी चार चेंडूत दोन धावा हव्या होत्या. तिसरा चेंडू शास्त्री यांनी स्क्वेअर लेगला तटवला, मात्र त्या चेंडूवर एकच धाव मिळाली. आता, स्ट्राइकला भारताचे मनिंदर सिंग होते. मॅथ्यूज यांनी त्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. पाचवा चेंडू मनिंदर यांच्या पायावर आदळला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले आणि पंच विक्रमराजू यांनी बोट वर उचलले. मनिंदर बाद झाले आणि सामना टाय झाला. क्रिकेटच्या इतिहासात टाय होणारा हा अवघा दुसरा कसोटी सामना होता.
त्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार डीन जोन्स व कपिल देव यांना विभागून देण्यात आला. पुढील दोन कसोटी देखील अनिर्णित राहिल्याने मालिका बरोबरीत सुटली. एकदिवसीय मालिकेत मात्र, भारताने ऑस्ट्रेलियाला ३-२ ने पराजित केले.
कायम आपल्या अचूक निर्णयांसाठी प्रसिद्ध असलेल्या विक्रमराजू यांना, मनिंदर यांना बाद देण्यावरून बरीच टीका सहन करावी लागली होती. मात्र ते आपल्या निर्णयावर कायम अटळ राहिले.
त्या सामन्यात अखेरचे बाद होणारे मनिंदर सांगतात,
” राजू यांनी मला बाद दिले तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. कारण, चेंडू माझ्या बॅटला लागला होता. राजू यांनी निर्णय देण्याची खूप घाई केली. रवी शास्त्री व मी ओरडून त्यांना सांगत होतो की, चेंडू बॅटला लागला आहे. पण, त्यावेळची परिस्थिती खूप तणावाची होती, म्हणून कदाचित त्यांच्याकडून ही चूक झाली असावी.”
अखेरचा बळी घेणारे ग्रेग मॅथ्यूज विक्रमराजू यांच्याविषयी बोलतात,
“माझ्या संपूर्ण कारकिर्दीत विक्रमराजू यांच्या इतका धाडसी पंच मी पाहिला नाही. जो काही निर्णय होता तो त्यांनी दिला व त्यावर ते ठाम राहिले.”
१९६० च्या व १९८६ च्या या दोन्ही टाय कसोटीत, ऑस्ट्रेलियाचे बॉब सिंपसन हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहभागी असणारे एकमेव खेळाडू होते. १९६० च्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीत खेळाडू तर १९८६ भारताविरुद्धच्या कसोटीत ते ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक होते. या कसोटीनंतर आजतागायत पुन्हा एकही कसोटी टाय झाली नाही.
वाचा-
-१९९२ क्रिकेट विश्वचषकाची दुसरी ओळख म्हणजे मार्टिन क्रो