आयपीएल इतिहासात डोकावून पाहिले तर, २० षटकांच्या लीगमध्ये अधिकतर फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. फलंदाजांनी त्यांच्या दमदार फटकेबाजीने विरुद्ध संघातील गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आहे. पण, काही गोलंदाजांपुढे मोठ-मोठ्या फलंदाजांचीही बोलती बंद होते.
जरी एखाद्या संघाने विरुद्ध संघाला लहान आव्हान दिले असले, तरी गोलंदाज त्यांच्या दमदार गोलंदाजी प्रदर्शनाने आपल्या संघाला सामना जिंकून देऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, २३ एप्रिल २०१७ रोजीचा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील सामना. कोलकाता येथे पार पडलेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत आरसीबी संघाला १३१ धावांचे आव्हान दिले होते. आरसीबी संघासाठी हे आव्हान पूर्ण करणे जास्त कठीण नव्हते. पण, आरसीबी संघ केवळ ९.४ षटकात ४९ धावांवर सर्वबाद झाला होता. यामध्ये केकआर संघातील गोलंदाजांचा मोठा वाटा होता. त्यांनी दमदार गोलंदाजी प्रदर्शन करत आरसीबीच्या फलंदाजांना २ आकडी धावादेखील करु दिल्या नव्हत्या.
असेच रोमांचक आयपीएल सामने पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. कारण, २९ मार्चपासून होणारा आयपीएलचा १३वा हंगाम कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. पण, १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएल २०२०ची सुरुवात होणार आहे, तर १० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. यापुर्वी २०१४मध्ये भारतात निवडणूका चालू असल्यामुळे आयपीएलचे काही सामने युएईमध्ये खेळण्यात आले होते.
या लेखात, आयपीएलच्या १३व्या हंगामात युएईमध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीची कमाल दाखवू शकणाऱ्या ५ फिरकीपटूंचा आढावा घेण्यात आला आहे.
तर बघूयात कोण आहेत ते ५ फिरकीपटू… (These 5 Spinners Can Do Best Bowling On UAE Ground)
१. आर अश्विन –
२००९ साली चेन्नई सुपर किंग्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या आर अश्विनने आतापर्यंत १३९ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २६.४७च्या सरासरीने १२५ विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्स व्यतिरिक्त अश्विन राइजिंग पुणे सुपरजायंट्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या संघांकडून खेळला आहे.
अश्विन त्याच्या गोलंदाजीतील विविधतांसाठी ओळखला जातो. सोबतच त्याला जगातील सर्वात चतुर फिरकीपटूंमध्ये गणले जाते. युएईच्या मैदानावर अश्विनला जास्त चांगली कामगिरी करता आली नाही. पण, यंदा अश्विन युएईमध्ये त्याच्या फिरकी गोलंदाजीचा जलवा दाखवू शकतो. आयपीएल २०२०च्या लिलावात अश्विन किंग्स इलेव्हन पंजाबमधून ट्रेड होऊन दिल्ली कॅपिटल्स संघात गेला आहे. त्यामुळे यंदा अश्विन दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसेल.
२. राशिद खान –
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला वर्तमान काळातील जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू समजले जाते. तो बऱ्याच काळापासून आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. राशिद २०१७ पासून आयपीएलमधील सनराइजर्स हैद्राबाद संघाचा भाग आहे. त्याने आतापर्यंत ४६ सामने खेळत ५५ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याचा इकोनॉमी रेट ६.५५ इतका आहे.
राशिद हा सनराइजर्स हैद्राबाद संघाचा मुख्य गोलंदाज आहे. आयपीएल २०२०मध्येही संघाला त्याच्याकडून अनेक अपेक्षा असणार. राशिद जर युएईच्या मैदानावर त्याच्या फिरकी गोलंदाजीचा कमाल दाखवण्यात यशस्वी ठरला, तर यंदा हैद्राबाद संघाच्या आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या शक्यता वाढू शकतात.
३. इमरान ताहिर –
गतवर्षी चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. यामध्ये दक्षिण आफ्रिकाच्या फिरकीपटू इमरान ताहिरचा मोलाचा वाटा होता. ताहिरने आयपीएलच्या १२व्या हंगामात १७ सामने खेळत सीएसके संघाकडून सर्वाधिक २६ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या शानदार गोलंदाजी प्रदर्शनामुळे त्याला गतवर्षी पर्पल कॅप मिळाली होती.
ताहिरला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये गणले जाते. त्याचे आयपीएलमधील प्रदर्शनदेखील उल्लेखनीय राहिले आहे. २०१४ साली आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या ताहिरने आतापर्यंत ५५ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने १५.५२च्या सरासरीने ७९ विकेट्स चटकावल्या आहेत. त्याचा आयपीएलमधील इकोनॉमी रेट हा ७.८८ इतका आहे. ताहिर यंदा देखील युएईमध्ये त्याच्या फिरकी गोलंदाजीची कमाल दाखवू शकतो. ताहिरच्या गोलंदाजी प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असेल.
४. युझवेंद्र चहल –
२०११ साली मुंबई इंडियन्सने युझवेंद्र चहलला आपल्या संघात सामाविष्ट केले होते. पण त्याला पूर्ण हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. दुर्दैवाने पुढील २ वर्षेदेखील चहलला चांगले प्रदर्शन करता आले नाही. अखेर २०१४ साली त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून दमदार सुरुवात केली. त्याने पूर्ण हंगामात दमदार प्रदर्शन करत आपले संघातील स्थान पक्के केले.
चहल हा भारतीय संघातील मुख्य फिरकीपटूंपैकी आहे. त्याने आयपीएलमध्ये ८४ सामने खेळत १०० विकेट्स चटकावल्या आहेत. आयपीएल २०२०मध्ये चहल आरसीबी संघाचा महत्त्वाचा गोलंदाज असेल. जर, युएईच्या मैदानावर चहलची फिरकी गोलंदाजी टिकली, तर यंदा आरसीबी पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकू शकते.
५. अमित मिश्रा –
अमित मिश्रा हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा मिश्रा हा दूसरा गोलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १४७ सामने खेळत १५७ विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या १७ धावा देत ५ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश आहे.
मिश्रा आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स, डेक्कन चार्जर्स आणि सनराइजर्स हैद्राबाद संघाकडून खेळला आहे. यंदा तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. तो युएईच्या मैदानावर त्याच्या फिरकी गोलंदाजीची कमाल दाखवू शकतो.
ट्रेंडिंग लेख –
४ अशी कारणे, ज्यामुळे श्रेयस अय्यरची दिल्ली कॅपिटल्स दुबई जिंकणारचं
जगातील ३ असे गोलंदाज, ज्यांनी किंग कोहलीला दाखवला आहे सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त २४ खेळाडूंना घेऊन जाता येणार दुबईला, या टीमला वगळावे लागणार प्रत्येकी एका खेळाडूला
तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड पाकिस्तान कसोटीची नक्की काय आहे अवस्था, वाचा थोडक्यात
अजब इतिहास! कर्णधाराने शुन्यावर डाव घोषीत करुनही संघाला मिळवून दिला होता विजय