मागील काही काळापासून भारतीय संघाचे बरेच खेळाडू दुखापतींचा सामना करत आहेत. या खेळाडूंमध्ये भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाचाही समावेश आहे. बुमराह दीर्घ काळापासून भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. 29 वर्षीय गोलंदाज पाठीच्या दुखापतीमुळे सप्टेंबर 2022पासून एकही सामना खेळला नाहीये. इतकेच नाही, तर 2022च्या टी20 विश्वचषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीतही तो संघाचा भाग नाहीये. मात्र, आयपीएल 2023मध्ये बुमराह मैदानावर परतण्याची अपेक्षा आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. अशात त्याच्याविषयी माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा याने मोठे भाष्य केले आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि वनडे विश्वचषक या दोन्ही मोठ्या स्पर्धा याचवर्षी पार पडणार आहेत. अशात बीसीसीआय जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला आयपीएल 2023 (IPl 2023) स्पर्धेत विश्रांती देण्याचा विचार करेल, जेणेकरून त्याच्या शरीरावर जास्त दबाव पडणार नाही आणि तो दुखापतग्रस्त होण्यापासून वाचू शकेल. अशात आकाश चोप्रा (Aakash Chopra) म्हणाला की, जर बीसीसीआयची मागणी असेल, तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने काही सामन्यांसाठी बुमराहला विश्रांती दिली पाहिजे. त्याला यावर्षीच्या अखेरीस मोठ्या स्पर्धांसाठी पूर्ण फिट होण्याची गरज आहे.
आकाश चोप्रा एका वेबसाईटशी बोलताना म्हणाला की, “तुम्ही आधी एक भारतीय खेळाडू आहात आणि नंतर तुमच्या फ्रँचायझीसाठी खेळता. त्यामुळे जर बुमराहला कोणतीही असुविधा जाणवली, तर बीसीसीआय पुढे येऊन फ्रँचायझीला सांगेल की, आपण त्याला खेळवू नका. बुमराह जर जोफ्रा आर्चरसोबत सात सामने खेळला नाही, तर जग नष्ट होणार नाही. तसेच, जेव्हाही तुम्ही फिट होता, तेव्हा खेळायचे असते. कारण, हे तुम्हाला चांगले बनवते. त्यामुळे मला निश्चितरीत्या वाटते की, जर बीसीसीआयने पाऊल उचलले, तर मुंबई यावर लक्ष देईल. कारण, तो देशाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्या कामकाजाचे व्यवस्थापन करणे कठीण आहे.”
नुकतेच बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात बुमराहचे नाव नव्हते. बीसीसीआय म्हणाली की, स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे बुमराहला बरे होण्यास वेळ लागत आहे. तसेच, भारतीय संघ व्यवस्थापनाला चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर लगेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी त्याला संघात सामील करण्याची जोखीम घ्यायची नाहीये.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना
लंडनच्या ओव्हलमध्ये 7 ते 11 जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. यामध्ये भारत अंतिम सामना खेळण्याची दाट शक्यता आहे. याव्यतिरिक्त वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी बुमराह भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला बुमराहला फिट ठेवायचे आहे. (this former indian cricketer big statement on jasprit bumrah injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, मॅक्सवेलसह स्टार खेळाडूंचे पुनरागमन
आता चुकायचं नाही! सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला नडणार का टीम इंडिया? जाणून घ्या संभावित प्लेइंग XI