fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टाॅप ५- प्रो कबड्डीतील टॉप ५ बचावपटूंच्या कामगिरीवर एक नजर…

– अनिल भोईर (Twitter- @anilbhoir96)

आक्रमकता व बचाव या दोन गोष्टी कोणत्याही खेळाचा महत्वाचा भाग असतात. क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे फलंदाज व गोलंदाज दोन महत्वाचे असतात तसेच कबड्डीमध्ये चढाईपटू व बचावपटू हे महत्वाचे भाग आहेत. कोणत्याही खेळामध्ये बचावपटूची भूमिका महत्वाची असते.

एक फलंदाज संघाला सामना जिंकून देऊ शकतो पण संघाचे गोलंदाज स्पर्धा जिंकून देऊ शकतात. त्याचप्रमाणे कबड्डीमध्ये चढाईपटू सामना जिंकून देऊ शकतो पण संघाच्या भिंती मजबूत नसतील तर स्पर्धा जिंकणे कठीण आहे, त्यासाठी संघाची बचावफळी भक्कम असणे आवश्यक आहे.

कबड्डीमध्ये संघात प्रत्यक्ष ७ खेळाडू खेळत असतात पण त्यामध्ये किमान चार खेळाडू हे बचावपटू आवश्यक आहे. त्यात अष्टपैलू खेळाडूंचा समावेश असू शकतो. कबड्डीत आक्रमकतेबरोबर बचाव करणे आवश्यक असते. कबड्डीत सात पैकी चार महत्वाच्या जागा म्हणजे राईट कॉर्नर, लेफ्ट कॉर्नर, राईट कव्हर, लेफ्ट कव्हर एकप्रकारे संघाच्या चार भिंतीच असतात

प्रो कबड्डीच्या आतापर्यंतच्या पाच हंगामात बचावपटूची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे. प्रो कबड्डीतील टॉप पाच बचावपटूच्या कामगिरीवर एक नजर टाकूया:

मनजीत चिल्लर: लेफ्ट कव्हर (अष्टपैलू)
प्रो कबड्डीतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी बचावपटू आहे. मनजीत चढाईपटूला ब्लॉक व डॅश करण्यात महारथी आहे. संघाच्या विजयात मनजीतची भूमिका महत्त्वाची असते. भारतीय संघात पण या अनुभवी खेळाडूने आपली महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे.
मनजीतने आतापर्यंत प्रो कबड्डीमध्ये ७४ सामने खेळले असून पकडीमध्ये सर्वाधिक २४३ गुण त्याच्या नावावर आहेत. एकाच सामन्यात पाच किंवा पाच पेक्षा जास्त पकडीत गुण मिळवण्याचा कारनामा १९ वेळा केला आहे.
मनजीत पर्व सहामध्ये तामिळ थालावज यासंघाकडून खेळताना दिसेल.

सुरेंद्र नाडा: लेफ्ट कॉर्नर
प्रो कबड्डीमध्ये आतापर्यंतचा उत्कृष्ट लेफ्ट कॉर्नरचा बचावपटू म्हणजे नाडा. चढाईपटूचा चवडा (अँकलहोल्ड) पकड्यात पटाईत असलेला खेळाडू म्हणून ओळख आहे. प्रो कबड्डीमध्ये मनजीत बरोबरच नाडाने १९ वेळा हायफाय केला आहे.
सुरेंद्र नाडाने आतापर्यंत खेळल्या ८० सामन्यांमध्ये २१८ पकडीत गुण मिळवले आहेत. हरियाणा स्टीलर्सने एफबीएम कार्डचा वापर करून नाडा सहाव्या पर्वसाठी संघात कायम केले आहे.

संदीप नरवाल: राईट कॉर्नर (अष्टपैलू)
संदीप प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू आहे. संदीप नरवाल चपळ व आक्रमक खेळाडू असून समोरच्या खेळाडूला चकवण्यात पटाईत आहे. संदीपचा बॅकहोल्ड व पकडी जबरदस्त आहेत.
प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक ८३ सामने खेळला असून पकडीमध्ये २१३ गुण आहेत. १४ वेळा हायफाय केला आहे. सहाव्या पर्वसाठी पुणेरी पलटणने संदीपला लिलावा आधीच रिटेन केलं होतं.

मोहित चिल्लर: राईट कॉर्नर
कबड्डीमधील कोपऱ्याच्या जोडीपैकी सर्वातम जोडी म्हणजे नाडा- मोहितची जोडी. मोहित चिल्लर चवडा पकड्यात पटाईत आहे. त्याचंबरोबर साखळीकरून पकड करण्याचं कौशल्य आहे.
मोहितने आतापर्यंत प्रो कबड्डीत ७७ सामने खेळले असून पकडीमध्ये २०९ गुण मिळवण्यात यशस्वी झाला आहे. मनजीत आणि नाडानंतर जास्त हायफाय करण्यात मोहितचा नंबर लागतो. १७ वेळा हायफाय करण्यात यशस्वी झाला आहे. मोहित चिल्लर सहाव्या पर्वात जयपूर पिंक पँथरकडुन खेळताना दिसेल. पाच पर्वानंतर प्रथम नाडा आणि मोहित दोन्ही वेगवेगळ्या संघात खेळताना दिसतील.

रविंदर पहल: राईट कॉर्नर
रविंदर पहल आक्रमक बचावपटू असून बॅकहोल्ड करण्यात पटाईत आहे. प्रो कबड्डीत आतापर्यंत ६७ सामने खेळला असून पकडीमध्ये २०० पेक्षा जास्त गुण मिळवण्याचा यादीमध्ये २०४ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. १६ वेळा हायफाय केला आहे. सहाव्या पर्वात रविंदर दबंग दिल्लीच्या संघात खेळताना दिसेल

वरील पाच खेळाडूंबरोबरच धर्मराज चिरलासन, गिरीश इरणाक, सुरजीत सिंग, विशाल माने, निलेश शिंदे, फझल अत्राचली या बचावपटूनी प्रो कबड्डीत आपला महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

प्रो कबड्डीतील पाच हंगामातील बेस्ट डिफेंडर
पर्व १: मनजीत चिल्लर (५१ गुण, १६ सामने)
पर्व २: रविंद्र पहल (६० गुण, १४ सामने)
पर्व ३: मनजीत चिल्लर (६१ गुण, १५ सामने)
पर्व ४: फझल अत्राचली (५२ गुण, १६ सामने)
पर्व ५: सुरेंद्र नाडा (८० गुण, २१ सामने)

कबड्डी संदर्भातील काही खास बातम्या-

संघ बदलुनही अनुप कुमारच्या नावावर होणार असा विक्रम जो कुणालाही मोडणं केवळ अशक्य!

प्रो-कबड्डीमध्ये हे १२ खेळाडू होऊ शकतात १२ संघांचे कर्णधार!

आशियाई स्पर्धेसाठी १५ व १७ जूनला होणार भारतीय कबड्डी संघांची निवड

तामिल थलायवाजकडून कबड्डी अकादमी स्थापनेची घोषणा

You might also like