नुकताच इंडियन प्रीमीयर लीगच्या चौदाव्या हंगामाचा मिनी लिलाव पार पडला आहे. या लिलावात उतरलेल्या भारतीय दिग्गज सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरला मुंबई इंडियन्स संघात स्थान मिळाले आहे. २० लाखांच्या मुळ किंमतीला मुंबईने त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले आहे. मात्र लिलावाला ४ दिवस उलटले तरीही अर्जुनला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहेत. अशात सचिनचा जवळचा मित्र विनोद कांबळी याने अर्जुनची पाठराखण केली आहे.
नेपोटिझमचे दिले होते नाव
अर्जुनचा पिता सचिन हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. तोदेखील आपल्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत मुंबई इंडियन्सच्या संघाचाच भाग होता. त्यांनतर आता ज्युनिअर तेंडूलकरला अर्थात अर्जुनलाही पाच वेळच्या विजेत्या मुंबईच्या संघाने विकत घेतले आहे. त्यामुळे अनेकांनी याला नेपोटिझमचे नाव देत अर्जुनवर टीका केली आहे.
इतर युवा खेळाडूंप्रमाणे अर्जुनलाही प्रेरणेची गरज
यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू कांबळीने अधिकृत ट्विटर अकाउंटवर अर्जुनसोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘मी अर्जुनच्या हृद्यात क्रिकेटप्रती असलेले प्रेम आणि त्याचे अथक परिश्रम पाहिले आहेत. मुंबई प्रीमियर लीग अर्थात एमपीएल दरम्यान आमच्यात क्रिकेटविषयी चर्चा केली होती. त्याची क्रिकेटबद्दलची निष्ठा कौतुकास्पद आहे. त्याने इतर युवा खेळाडूंप्रमाणे नुकतीच क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली आहे. अशात त्याला प्रेरित करण्याचा प्रयत्न करा.’
The hard work and love for the game that I've seen in Arjun is immense. During the MPL, we used to have long chats about the game and it was so good to see his dedication for the game.
He's just begun, so like any other youngster, let's motivate him to do well ???????? pic.twitter.com/Gg6aos6HAg— Vinod Kambli (@vinodkambli349) February 21, 2021
कांबळीपुर्वी मुंबई इंडियन्स संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सहकारी झहीर खाननेही अर्जुनला पाठींबा दर्शवला होता. एवढेच नव्हे तर, बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनेही अर्जुनची बाजू घेत वक्तव्य केले होते.