भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर पाहुणा संघ मजबूत स्थितीत आहे. पाहुण्या संघाचा कर्णधार जो रूटचे नाबाद शतक आणि त्याला सलामीवीर डॉम सिबलीने दिलेली साथ यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा संघ ३ बाद २६३ अशा मजबूत स्थितीत आहे.
मात्र, याव्यतिरिक्त पहिल्या दिवशी एका अनोख्या घटनेने सगळ्या क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय कर्णधार विराट कोहलीने खिलाडूवृत्ती दाखवून जो रूटला केलेल्या मदतीमुळे अनेकांनी त्याचे कौतुक केले. तसेच कोहलीच्या या कृतीमुळे अनेकांना माजी कर्णधार एमएस धोनीची देखील आठवण आली.
त्याचे झाले असे की, इंग्लंडचा कर्णधार शतक झळकवल्यावर देखील अतिशय आत्मविश्वासाने खेळत होता. त्यात ८७व्या षटकाला आर अश्विन गोलंदाजी करत असताना रूटने शेवटच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार खेचला. मात्र त्यानंतर नॉन-स्ट्रायकर एंड कडे येत असताना त्याला पायात वेदना झाली आणि तो जमिनीवर पडला. त्यावेळी सामना थांबवण्यात आला आणि इंग्लंडचे फिजिओ मैदानात आले.
मात्र फिजिओ येण्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीच रूटच्या मदतीला धावून गेल्याचे दिसले. कोहलीने रूटचे पाय स्ट्रेच करत त्याची वेदना कमी करण्यासाठी मदत केली. भारतीय कर्णधाराने दाखवलेली ही खिलाडूवृत्ती पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले. तसेच ही घटना पाहून अनेकांना माजी कर्णधार एमएस धोनीची आठवण झाली. धोनीने काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसला देखील अशीच मदत केली होती.
#SpiritOfCricket at its very best 😊😊#INDvENG @Paytm | @imVkohli pic.twitter.com/vaEdH29VXo
— BCCI (@BCCI) February 5, 2021
Same energy. pic.twitter.com/yjTwvr8RaV
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 5, 2021
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास पहिल्या दिवसाच्या खेळावर पाहुण्या संघाचे वर्चस्व राहिले. कर्णधार जो रूटने शतक झळकवत इंग्लंडला दिवसाखेर मजबूत स्थितीत नेऊन ठेवले. पहिल्या दिवशी अनुभवी भारतीय गोलंदाजांनाही फारशी कमाल दाखवता आली नाही. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी सामन्यात पुनरागमन करण्यासाठी भारतीय गोलंदाजांना कष्ट घ्यावे लागतील.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! लिव्हरपूलला जर्मनीमध्ये येण्यास बंदी, हे आहे कारण
ब्रेकिंग! प्रसिद्ध फुटबॉलपटू आंद्रे ओन्नावर एका वर्षाची बंद, हे आहे कारण