श्रीलंका आणि वेस्ट इंडीज यांच्या दरम्यानच्या टी२० मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात यजमान वेस्ट इंडीजने श्रीलंकेला पराभूत करत मालिकेवर कब्जा केला. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा फॅबियन ऍलन सामनावीर ठरला. उभय संघांमध्ये आता वनडे मालिका खेळवली जाईल.
वेस्ट इंडीजचा मालिका विजय
कोरोना महामारीनंतर वेस्ट इंडीजमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळवली जात होती. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडीजने तर, दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला होता. त्यामुळे, तिसऱ्या सामन्याचे महत्व वाढले होते.
श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, संघाला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही आणि २७ धावसंख्येवर तीन गडी बाद झाले. दनुष्का गुणतिलिका ९, पथुम निशंका ५ आणि निरोशन डिकवेला यांना केवळ ४ धावा करता आल्या. मधल्या फळीत अनुभवी दिनेश चांदिमलने ४६ चेंडूत ५४ आणि आयसन बंदाराने ३५ चेंडूत नाबाद ४४ धावा करून संघाला सन्माननीय धावसंख्या मिळवून दिली. फॅबियन ऍलनने केवळ १३ धावा देऊन १ बळी घेतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. लेंडल सिमन्सने १८ चेंडूत २६ आणि एविन लुईसने १८ चेंडूत २१ धावा केल्या. मधल्या फळीत ख्रिस गेलला केवळ १३ धावा करता आल्या आणि कर्णधार कायरन पोलार्ड खाते उघडण्यास असमर्थ ठरला. यानंतर, निकोलस पूरनने १८ चेंडूत २३ धावा ठोकल्या. अखेर फॅबियन ऍलनने अवघ्या सहा चेंडूमध्ये तीन षटकारांच्या मदतीने नाबाद २३ धावा फटकावत यजमानांना विजय मिळवून दिला.
वनडे मालिकेला होईल सुरुवात
उभय संघांमध्ये १२ मार्चपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाईल. मालिकेतील तिन्ही सामने एॅटिन्गवा येथील सर विवीयन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवण्यात येतील.
महत्वाच्या बातम्या:
लकी लेडी! बड्डेदिनी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू, केलेत अनेक विक्रम
देशापेक्षा आयपीएलला प्राथमिकता देणार इंग्लिश क्रिकेटपटू?, मुख्य प्रशिक्षकाचे आले मोठे विधान