---Advertisement---

विजयाची नशा चढलेल्या बांगलादेशी खेळाडूंचे असभ्य वर्तन; भर मैदानात भिडले होते भारतीय खेळाडूंशी

On: बुधवार, जून 17, 2020 7:24 AM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका येथे 2020 साली झालेल्या 19 वर्षांखालील आयसीसी विश्वचषकात बांगलादेशच्या संघाने भारताला पराभूत करून पहिल्यांदा चषकावर आपले नाव कोरले. 4 वेळा आयसीसीच्या 19 वर्षांखालील विश्वचषकावर नाव कोरलेल्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात बांगलादेशने तीन गडी राखून पराभव केला. 

या ऐतिहासिक विजयापेक्षा बांगलादेशी खेळाडूंच्या वर्तनाची जास्त चर्चा झाली. विजयानंतर बांगलादेशी खेळाडू भारतीय खेळाडूंशी भर मैदानात पंचांच्या समोर भिडले. विजयाची नशा चढलेल्या बांगलादेशी खेळाडूंचे वर्तन अशोभनीय होते. त्यांच्या या वर्तनावर जागतिक क्रिकेटमधून टीकेचा भडीमारही झाला होता.

निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 177 धावा केल्या होत्या. सामन्यात पावसाचा वेळ आल्याने बांगलादेशला 170 धावांचे आव्हान मिळाले. बांगलादेशचा कर्णधार अकबर अली याने ‘मॅच विनिंग’खेळी करत संघाला विश्वचषक जिंकून दिला.

विजयानंतर बांगलादेशी खेळाडू मैदानावर धावत येऊन एकच जल्लोष करू लागले. विजयाचा जल्लोष करत असताना भारतीय खेळाडूंना ते अपशब्द वापरू लागले. इतकेच नव्हे तर बांगलादेशी खेळाडू बॅट आणि स्टंप घेऊन भारतीय खेळाडूंच्या अंगावर धावून गेले.

सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार प्रियम गर्ग म्हणाला की, “भारताची फलंदाजी सुरू होती तेव्हाही त्यांचे वेगवान गोलंदाज अधिक आक्रमकपणा दाखवत होते. विजयानंतर बांगलादेशी खेळाडूंचे वर्तन खूपच घाणेरडे होते. बांगलादेशी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना अपशब्द वापरल्यामुळे दोन्ही खेळाडूत वाद सुरू झाला, असे कधीच होऊ नये.”

बांगलादेशी खेळाडूंच्या आक्रमक वर्तनावर कर्णधार अकबर अली याने शेवटी माफी मागितली. तो म्हणाला, “आमचे गोलंदाज जास्त भावूक झाले होते. सामना संपल्यानंतर जे काय झाले ते फारच दुर्दैवी आहे, असे व्हायला नाही पाहिजे होते. माझ्या संघातील खेळाडूंची चुकी झाली आहे. त्यामुळे मी माफी मागतो. कोणत्याही स्तरावर अशा प्रकारच्या घटना होता कामा नये. भारतीय संघाने देखील सामन्यात चांगला खेळ केला. मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो.”

भारताने सर्वाधिक चार वेळा जिंकला 19 वर्षांखालील विश्वचषक 

भारतीय संघाने आतापर्यंत 19 वर्षांखालील विश्वचषकावर सर्वाधिक चार वेळा नाव कोरले आहे. मोहम्मद कैफ(2000),  विराट कोहली ( 2008), उन्मुक्त चंद (2012), पृथ्वी शॉ( 2018) या कर्णधारांनी भारताला विश्वचषक जिंकून दिला. भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाने दोनवेळा 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकला आहे. पाकिस्तान संघाने दोन वेळा तर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि बांगलादेश या संघांनी एकदा या विश्वचषकावर नाव कोरले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---