Jasprit Bumrah On Hardik Pandya :- आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले होते. मात्र मुंबई इंडियन्सचा निर्णय चाहत्यांना रुचला नाही. क्रिकेट चाहत्यांनी हार्दिकला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. तो नाणेफेकीला आल्यानंतर चाहते त्याला डिवचताना दिसले. वानखेडे स्टेडियमवर हार्दिकला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अगदी हार्दिकची जुनी फ्रँचायझी गुजरात टायटन्सचे होम ग्राउंड अहमदाबादमध्येही त्याला ट्रोल करण्यात आले. अनेक प्रसंगी चाहते हार्दिकला शिवीगाळ करतानाही दिसले. मात्र, यानंतर टी20 विश्वचषकात फलंदाजीशिवाय हार्दिकने गोलंदाजीतही आपली ताकद दाखवत टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. यामुळे चाहत्यांच्या नजरेत हार्दिक खलनायकापासून पुन्हा नायक बनला.
आता हार्दिकचा मुंबई इंडियन्समधील सहकारी आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने याप्रकरणी भाष्य केले आहे. हार्दिकच्या अडचणीच्या काळात मुंबई इंडियन्स संघ त्याच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे त्याने सांगितले.
“आम्ही हार्दिकसोबतच होतो. त्याच्यासोबत बोलत होतो. त्याला पाठींबा देण्यासही तयार होतो. पण काही गोष्टी समजण्यापलीकडे असतात. त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकत नाही. जर असं काही घडलं असेल तर ते घडलं.” असं बुमराहने हार्दिक पांड्याबाबत सांगितलं.
टी20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचं हार्दिकबाबतचं मत मात्र बदलल्याचं दिसून आलं. वानखेडे स्टेडियमवर त्याचा सन्मान केला गेला. याबाबत बोलताना बुमराह म्हणाला, ‘जेव्हा आम्ही विश्वचषक जिंकलो तेव्हा सर्व चित्र पालटून गेलं. हा एक प्रवासाचा भाग आहे. आम्ही शक्य तितका पाठिंबा देत राहू.’, असंही बुमराह पुढे म्हणाला.
दरम्यान टी20 विश्वचषकानंतर बुमराह मोठ्या सुट्टीवर आहे. तो श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत अनुपस्थित होता. आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याच्या खेळण्याची फार कमी शक्यता दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रहाणेचा नवा अवतार! इंग्लंडमध्ये षटकारांचा पाऊस पाडत संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवले
अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचे ‘या’ संघाकडे यजमानपद! क्वालिफायर सामन्यांचे करणार आयोजन
18 वर्षीय फलंदाजानं शानदार शतक झळकावून रचला इतिहास!






