मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यानची पुढील कसोटी मालिका ‘रिचडर्स-बोथम सीरिज’ नावाने ओळखली जाईल. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि क्रिकेट वेस्ट इंडीज यांनी संयुक्त निवेदनात ही घोषणा केली. शुक्रवारी उभय देशांमधील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना विस्डेन करंडकातील शेवटचा सामना असेल.
ईसीबीने म्हटले आहे की, “इंग्लंड आणि वेस्ट इंडीज पुढील कसोटी मालिका खेळल्यास त्याला रिचडर्स-बोथम ट्रॉफी म्हटले जाईल. हा दोन महान खेळाडूंसाठी सन्मान असेल. तसेच दोन्ही संघांमधील जवळचे नाते आणि परस्पर आदर निर्माण होईल.”
मंडळाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “मैदानावर मजबूत प्रतिस्पर्धी आणि मैदानाबाहेर जवळचे मित्र असलेल्या या दोन संघांमधील संबंध साजरा करण्याचा हा एक चांगला मार्ग असेल.”
सर व्हिव्हियन रिचडर्सने 121 कसोटी सामन्यांमध्ये 24 शतकांसह 8540 धावा केल्या होत्या तर सर इयान बोथमने 52 कसोटी सामन्यांत 5200 धावा केल्या आणि 383 विकेट्स घेतल्या होत्या.
रिचडर्स म्हणाले, “माझ्यासाठी आणि माझा चांगला मित्र इयानसाठी ही मोठी गोष्ट आहे. क्रिकेट मैदानावरील आमच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून ट्रॉफीला नाव ठेवणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हे मैदानाबाहेरच्या आमच्या संबंधांबद्दल बरेच काही सांगते.”
बोथम म्हणाले, “व्हिव्हियन हा आमच्याविरुद्ध खेळलेल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो एक चांगला मित्र आहे आणि आम्ही मैदानावर नेहमीच प्रतिस्पर्धी आहोत. त्याची विकेट घेतल्याने मला जास्त आनंद व्हायचा. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणे खूप कठीण होते.”
1963 मध्ये सुरू झालेली विजडन ट्रॉफी आता निवृत्त होईल. ती लॉर्ड्सच्या एमसीसी संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.