इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा 13वा सामना खेळला जात आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो विश्वचकात इंग्लंडविरुद्ध अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा सलामी फलंदाज बनला आहे. त्याने श्रीलंकन खेळाडू उपुल थरंगा याचा विक्रम मोडीत काढला आहे.
गुरबाजचा विक्रम
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी अफगाणिस्तान संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम जादरान खेळपट्टीवर उतरले होते. गुरबाजने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली होती. त्याने आदिल रशीद टाकत असलेल्या डावाच्या 11व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचत अवघ्या 33 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीत 2 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. हे त्याचे वनडे कारकीर्दीतील तिसरे अर्धशतक होते. या अर्धशतकाने त्याने खास विक्रम केला.
FIFTY for Rahmanullah Gurbaz ✅@RGurbaz_21 has been in tremendous form in Delhi as he brings up his 3rd ODI half-century, off just 33 deliveries. 👏#AfghanAtalan | #CWC23 | #AFGvENG | #WarzaMaidanGata pic.twitter.com/Ig6Da5M6YO
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 15, 2023
गुरबाज विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा युवा सलामी फलंदाज ठरला. त्याने 21 वर्षे आणि 321 दिवसांच्या वयात हा पराक्रम केला. त्याच्यापूर्वी या विक्रमात अव्वलस्थानी नामीबियाचा जोहान्स बर्गर असून त्याने 2003च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 21 वर्षे आणि 178 दिवसांच्या वयात अर्धशतक केले होते. याव्यतिरिक्त यादीत तिसऱ्या स्थानी श्रीलंकेचा माजी खेळाडू उपुल थरंगा असून त्याने 2007च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 22 वर्षे आणि 61 दिवसांच्या वयात अर्धशतक करण्याचा कारनामा केला होता.
रहमानुल्लाहची खेळी
या सामन्यातील रहमानुल्लाह याच्या खेळीविषयी बोलायचं झालं, तर आदिल रशीद टाकत असलेल्या 19व्या षटकातील पाचव्या चेंडूवर गुरबाज धावबाद झाला. त्यामुळे त्याला शतक न करताच तंबूचा रस्ता पकडावा लागला. त्याने 57 चेंडूत 80 धावांची वादळी अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 4 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. (Youngest opener to a WC half-century against England know list)
विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध अर्धशतक करणारे युवा सलामीवीर
जोहान्स बर्गर (नामीबिया)- 21 वर्षे आणि 178 दिवस- 2003
रहमानुल्लाह गुरबाज (अफगाणिस्तान)- 21 वर्षे आणि 321 दिवस- 2023*
उपुल थरंगा (श्रीलंका) – 22 वर्षे आणि 61 दिवस- 2007
हेही वाचा-
‘हा तर फुसका बॉम्ब, मोठ्या पोरांनी…’, भारताच्या विजयानंतर सेहवागची लक्षवेधी पोस्ट
लाईव्ह सामन्यातच शास्त्रींनी केले आफ्रिदीला ट्रोल; म्हणाले, ‘तो काय वसीम अक्रम नाही, त्याला हवेत…’