टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना क्रिकेटविश्वात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेबाबत माजी खेळाडू आणि क्रिकेट एक्स्पर्ट्स विविध अंदाज व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा अनुभवी लेग स्पिनर युझवेंद्र चहल याने टी20 वर्ल्ड कप 2026 संदर्भात काही मोठ्या आणि चर्चेत येणाऱ्या भविष्यवाण्या केल्या आहेत. विशेष म्हणजे चहलच्या अंदाजांमध्ये काही धक्कादायक नावे समोर आली आहेत.
युझवेंद्र चहलने ‘टूर्नामेंटचा सर्वोत्तम फलंदाज’ म्हणून युवा सलामीवीर अभिषेक शर्माचे नाव घेतले आहे. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला अभिषेक मोठ्या व्यासपीठावरही चमक दाखवेल, असा चहलचा विश्वास आहे. याशिवाय ‘टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू’ म्हणूनही चहलने अभिषेक शर्मालाच पसंती दिली आहे.
गोलंदाजी विभागात चहलचा विश्वास पूर्णपणे जसप्रीत बुमराहवर आहे. त्याने ‘टॉप बॉलर ऑफ द टूर्नामेंट’ आणि ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ या दोन्ही पुरस्कारांसाठी बुमराहचे नाव जाहीर केले आहे. दबावाच्या क्षणी विकेट काढण्याची क्षमता आणि अनुभव यामुळे बुमराह संपूर्ण स्पर्धेत निर्णायक भूमिका बजावेल, असे चहलचे मत आहे. विशेष म्हणजे प्लेअर ऑफ द टूर्नामेंटसाठी चहलने ना सूर्यकुमार यादवचे नाव घेतले, ना अभिषेक शर्माचे, यामुळे चर्चा रंगली आहे.
याशिवाय चहलने ज्या सामन्याची सर्वाधिक उत्सुकता आहे, तो सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान असल्याचे सांगितले. 15 फेब्रुवारी रोजी होणारा हा सामना संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेईल, असे त्याने स्पष्ट केले. ‘हायएस्ट टीम टोटल’ बाबत चहलने 240 धावांचा अंदाज व्यक्त केला असून, यंदाच्या स्पर्धेत मोठ्या धावसंख्या पाहायला मिळतील, असे संकेत दिले आहेत.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 7 फेब्रुवारी रोजी यूएसएविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना 15 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. ग्रुप स्टेज सामने 7 ते 20 फेब्रुवारीदरम्यान होतील, त्यानंतर सुपर-8, उपांत्य फेरी आणि 8 मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाईल.
टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये एकूण 20 संघ सहभागी होत असून, भारताला पाकिस्तानसह ग्रुप-A मध्ये स्थान देण्यात आले आहे. चहलच्या या भविष्यवाण्यांमुळे स्पर्धेपूर्वीच चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.






