टी२० क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या सर्वात छोट्या प्रारूपाशिवाय आधुनिक क्रिकेटची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. जगभरातील सर्वच क्रिकेट बोर्डांनी या क्रिकेटच्या झटपट प्रकारातील आपल्या लीग सुरू केल्या आणि अनेक आर्थिक प्रश्न सोडवले. आज तेच टी२० क्रिकेट मोठ झाला आहे. १८ वर्षाच झालं आहे.
टी२० क्रिकेटची सुरुवात होण्यामागचे कारण
क्रिकेटचा जन्मदाता देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडमध्ये २००० नंतर कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कमी होऊ लागली. प्रायोजक पाठ फिरवत होते. अशावेळी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर उपाय शोधण्यासाठी बोर्डाची एक बैठक बसली. अनेकांनी विविध पर्याय सुचवल्यानंतर बोर्डाचे मार्केटिंग मॅनेजर स्टुअर्ट रॉबर्टसन यांनी क्रिकेट आणखी लहान करण्याचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव इतरांना देखील आवडला व त्यावर काम करणे सुरू झाले.
असा खेळला गेला पहिला सामना
रॉबर्टसन यांची कल्पना सत्यात उतरवण्यासाठी जवळपास दीड वर्षाचा कालावधी गेला आणि २००३ काउंटी क्रिकेट हंगामाची सुरुवात टी२० क्रिकेटने झाली. १३ जून २००३ रोजी हॅम्पशायर विरुद्ध ससेक्स या दोन्ही अव्वल काउंटी संघांमध्ये साउथम्प्टन येथील रोज बाऊल मैदानावर पहिला अधिकृत टी२० सामना खेळला गेला. या सामन्यात यजमान हॅम्पशायरने प्रथम फलंदाजी करताना ससेक्ससमोर १५४ धावांचे आव्हान ठेवले जे पार करण्यात ससेक्सचा संघ ६ धावांनी कमी पडला. मात्र, पुढील काळात जागतिक क्रिकेटचे रूप बदलून टाकणाऱ्या या प्रकाराचा शुभारंभ झाला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पहिला सामना ५ ऑगस्ट २००४ मध्ये इंग्लंड महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला असा रंगला. या सामन्यात न्युझीलँड महिलांनी विजय मिळवला. तर, पुरुषांचा पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना १७ फेब्रुवारी २००५ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड असा ऑकलॅण्ड येथे झाला. रिकी पॉंटिंगने ठोकलेल्या ९८ धावांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ४४ धावांनी मोठा विजय मिळवला.
टी२० विश्वचषकाला सुरुवात
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी२० क्रिकेटचे आगमन होऊन दोन वर्ष होत नाहीत तोच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २००७ मध्ये टी२० विश्वचषक आयोजित केला आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना, सर्व वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत एमएस धोनीच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यानंतर, घडला तो केवळ इतिहासच म्हणावा लागेल.
पाकिस्तान सर्वात यशस्वी संघ
आंतरराष्ट्रीय टी२० चा विचार केल्यास पाकिस्तान सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी खेळलेल्या १७० पैकी १०४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने ८८ सामन्यात विजयश्री खेचून आणली. आतापर्यंत टी२० क्रिकेटचे ६ विश्वचषक पार पडले आहेत. यामध्ये वेस्ट इंडीजने २ तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका व इंग्लंड यांनी प्रत्येकी एक वेळा विश्वचषक उंचावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ढाका प्रीमियर लीगच्या अधिकाऱ्यांवर हल्ला, पोलीस आणि कर्मचाऱ्यांच्या वादात अधिकारी जखमी
इंग्लंड संघाची या महत्त्वाच्या टी२० मालिकेसाठी घोषणा, ६ वर्षांनंतर ‘या’ खेळाडूचे झाले पुनरागमन
हर्षेल गिब्सने सोडलेल्या ‘त्या’ ऐतिहासिक झेलाला झाली २२ वर्ष, पाहा व्हिडिओ