सुरेश रैना (Suresh Raina) म्हटले की आपल्या समोर येतो, चपळ क्षेत्ररक्षक, मैदानाच्या चोहीकडे आक्रमक फटके खेळणारा, मिस्टर IPL बिरूद मिरवणारा भारतीय संघाचा एक महत्वाचा खेळाडू. परंतु आपल्यापैकी कितीतरी जणांना रैनाच्या लहानपणीच्या ‘स्ट्रगल’ ची माहिती नसेल. त्याच्या लहानपणीच्या काही गोष्टी वाचल्यानंतर अनेक वेबसिरीजची दृश्ये डोळ्यासमोरून गेल्याशिवाय राहणार नाहीत.
बालपणीच्या काही न विसरू शकणाऱ्या घटनांचा उलगडा करताना रैना सांगतो,”मी लखनौच्या स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये राहायचो. आम्ही एकदा रेल्वेने आग्र्याला मॅच खेळण्यासाठी चाललो होतो. बोचरी थंडी असल्याने मी पॅड, चेस्ट गार्ड, थाय पॅड घालून खालीच झोपलो होतो. मला अचानक जाग आली आणि उडालोच. एक मुलगा माझ्या अंगावर लघवी करण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या सोबत अजून १२-१५ खेळाडू होते. थोडावेळ झटापट झाल्यानंतर मी त्या मुलाला डब्याच्या बाहेर काढले. या घटनेसोबतच हॉस्टेलमध्ये देखील काही गंभीर गोष्टी घडल्या होत्या, त्यामुळे मी हॉस्टेल सोडण्याचा निर्णय घेतला होता. एकदा तर आत्महत्येचा विचार देखील मनात आला होता.”
रैनाच्या म्हणण्याप्रमाणे, ” एथलेटिक्स विभागातील खेळाडू माझा खूप तिरस्कार करत. त्यांना वाटत की, क्रिकेट कोच रैनावर विशेष लक्ष देतात. अशाने तो खूप पुढे जाईल. ती मुले फक्त प्रमाणपत्र मिळवून रेल्वे किंवा इतर ठिकाणी नोकरी करण्याची आशा ठेवुन असत. हॉस्टेलमध्ये नवीन असताना ती मुले दुधात कचरा टाकत, कधी पहाटे तीन वाचता थंड पाण्याची बादली अंगावर ओतत. त्यावेळी राग खूप येई पण आपण एक मारली तर ते सर्व मिळून मारतील याची भीती वाटत.
एकदा त्या टारगट मुलांनी मला हॉकी स्टीकने देखील मारले होते. त्या मुलांमुळे एक मित्र कोमात गेला होता तर एकाने हॉस्टेलच्या छतावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु मी आणि माझा मित्र नीरजने त्याला पुढे होणाऱ्या परिणामांची जाणीव करून दिल्याने तो थांबला.
आमच्या हॉस्टेलवर प्रतापगढ, आझमगढ, गोरखपूर, रायबरेली येथून देखील विद्यार्थी येत आणि ते कायम सोबत बंदूक बाळगत. त्यांच्याशी वाद घातला तर जीव गमवावा लागायचा. म्हणून आम्हाला शांत बसावे लागत. ”
रैना आज एक यशस्वी क्रिकेटपटू असला तरी त्या मागे अशी भयंकर पार्श्वभूमी आहे जी आठवली तरी रैनाचे डोळे ओले होतात.
भारतासाठी ७८ आंतरराष्ट्रीय टी २० सामने खेळून १६०५ धावा फटकावणाऱ्या रैनाची नजर आगामी टी २० वर्ल्डकप मधून भारतीय संघात पुनरागमन करण्यावर आहे.