Loading...

भारत-विंडीज संघात आज होणाऱ्या दुसऱ्या टी२०सामन्याबद्दल सर्वकाही…

तिरुअनंतपुरम। आज(8 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडणार आहे. हा सामना ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुअनंतपुरम येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल.

Loading...

या सामन्यात विजय मिळवून वेस्ट इंडिज विरुद्ध सलग 8 वा टी20 विजय मिळवण्यावर भारतीय संघाची नजर असेल. नोव्हेंबर 2018 पासून भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध सात टी 20 सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत.

आजच्या सामन्याआधी शुक्रवारी हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने सहा गडी राखून विजय मिळवला होता. तसेच तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे आता आजचा सामना जिंकून भारतीय संघ मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल.

भारताने शुक्रवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने दिलेले 208 धावांचे लक्ष्य 18.4 षटकांत पूर्ण केले होते. या विजयाबरोबरच भारताने त्यांचा टी20मधील सर्वाेच्च धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचाही विक्रम केला होता.

Loading...

या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली होती. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद 94  धावांची खेळी खेळली. तर जखमी शिखर धवनच्या जागी खेळत असलेल्या केएल राहुलने संधीचा पुरेपूर फायदा घेत 40 चेंडूत 62 धावा केल्या. तसेच खराब फॉर्मशी झगडणाऱ्या रिषभ पंतनेही 9 चेंडूत 18 धावांची छोटेखानी पण चांगली खेळी केली. 

त्यामुळे आजचा सामन्याआधी भारतीय संघाला फलंदाजांच्या फॉर्मची चिंता नसेल. मात्र भारतासमोर गोलंदाजांच्या फॉर्मची समस्या असेल.

शुक्रवारच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या एव्हिन लुईस, शिमरोन हेटमेयर आणि कर्णधार कायरन पोलार्ड यांनी भारतीय गोलंदाजांना कोणतीच संधी दिली नाही. त्यांनी आक्रमक फटकेबाजी केली. 

Loading...
Loading...

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध प्रभावी ठरलेल्या दीपक चाहरने 54 धावा दिल्या आणि त्याने फक्त एक खेळाडू बाद केला. तसेच भारताच्या टी20 संघात पुनरागमन केलेल्या भुवनेश्वर कुमारला एकही विकेट मिळाली नाही आणि त्याने चार षटकांत 36 धावा दिल्या. वॉशिंग्टन सुंदर पुन्हा एकदा अपयशी ठरला

त्यामुळे आता आजच्या सामन्यासाठी कुलदीप यादवला 11 जणांच्या भारतीय संघात संधी मिळते का हे पहावे लागेल. त्याचबरोबर भारतीय संघाला क्षेत्ररक्षणावरही लक्ष द्यावे लागेल.

दुसरीकडे वेस्ट इंडिज संघही आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. तसेच आज त्यांना गोलंदाजीत सुधारणा होण्याची अपेक्षा असेल. शुक्रवारच्या सामन्यात त्यांना 208 धावांचे रक्षण करण्यात अपयश आले होते. तसेच त्यांनी जवळजवळ 23 धावा अतिरिक्त दिल्या होत्या.

आजच्या सामन्यासाठी यातून निवडले जातील अंतिम 11 जणांचे संघ –

भारतः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, संजू सॅमसन, रिषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

वेस्ट इंडीजः लेंडल सिमन्स, एव्हिन लुईस, ब्रॅंडन किंग, शिमरोन हेटमेयर, कायरन पोलार्ड (कर्णधार), दिनेश रामदिन, जेसन होल्डर, खॅरी पिएर, हेडन वॉल्श, शेल्डन कोट्रेल, केसरिक विल्यम्स, फॅबियन ऍलन, निकोलस पूरन, किमो पॉल, शेर्फेन रुदरफोर्ड.

You might also like
Loading...