आयपीएलमध्ये आत्तापर्यंत झालेल्या सर्व १२ मोसमात खेळलेल्या संघांपैकी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ देखील आहे. त्यांच्याकडून आत्तापर्यंत अनेक स्टार खेळाडू देखील खेळले आहेत. यात विराट कोहली, एबी डिविलियर्स, शेन वॉट्सन, ख्रिस गेल, मिशेल स्टार्क, डेल स्टेन, केएल राहुल, युवराज सिंग अशा अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे. मात्र त्यांना प्रत्येकवेळी आयपीएलचे विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे.
बेंगलोर संघाने २००९, २०११ आणि २०१६ असे तीन वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र तिन्ही वेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना अजून पहिल्या आयपीएल विजेतेपदाची प्रतिक्षा आहे.
बेंगलोर संघाकडून स्टार खेळाडूंव्यतिरिक्त अनेक चांगले खेळाडू खेळले मात्र जेव्हाही बेंगलोर संघाचे नाव घेतले जाते तेव्हा त्यांची चर्चा खूप कमी प्रमाणात होते. पण त्या खेळाडूंनी बेंगलोरकडून चांगली कामगिरी केली आहे. अशाच बेंगलोर संघाकडून खेळलेल्या 3 खेळाडूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे ज्यांना कमी महत्त्व दिले गेले.
३. पार्थिव पटेल –
पार्थिव बेंगलोर संघाकडून ३ मोसम आत्तापर्यंत खेळला आहे. त्याने बेंगलोरकडून खेळताना आत्तापर्यंत ३२ सामन्यात ४ अर्धशतकांसह ७३१ धावा केल्या आहेत. तसेच त्याचा स्ट्राईकरेट १३० च्या आसपासही आहे. एवढेच नाही तर त्याने यष्टीरक्षण करताना बेंगलोरकडून २३ विकेट्सही घेतल्या आहेत. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सर्वाधिक विकेट्स घेणारा यष्टीरक्षक आहे.
पार्थिव २०१४ ला तसेच २०१८ आणि २०१९ असे ३ मोसम बेंगलोरकडून खेळला. त्यातील २०१९ च्या मोसमात त्याला बेंदलोरकडून सर्वाधिक १४ सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यानेही ही संधी वाया न घालवता २ अर्धशतकांसह ३७३ धावा केल्या होत्या. पण असे असतानाही अन्य खेळाडूंच्या कामगिरीपुढे पार्थिवची कामगिरी दुर्लक्षित राहिली.
पार्थिव भारताकडूनही ६५ सामन्यात खेळला असून यातील ५३ सामन्यात त्याने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळताना ११२ विकेट्स घेतल्या आहेत.
२. विनय कुमार –
बेंगलोर संघाकडून स्टेन, मुरलीधरन, अनिल कुंबळे असे अनेक स्टार गोलंदाज खेळून गेल्यानंतरही बेंगलोर संघ कधी गोलंदाजीसाठी ओळखला गेला नाही. अशामध्येच विनय कुमार हा देखील एक वेगवान गोलंदाज. भारताकडून ४१ सामने खेळणाऱ्या विनय कुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला चमकला. तसेच आयपीएलमध्ये त्याने समाधानकारक कामगिरी करुनही तो कुठेतरी झाकोळला गेला.
त्याला २००८ च्या आयपीएलमध्ये बेंगलोरने संघात घेतले होते. परंतू पहिल्या २ मोसमात त्याला केवळ १४ विकेट्सच घेता आल्या. परंतू २०१० चा मोसम त्याच्यासाठी खास ठरला. त्याने त्या मोसमात १६ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले. मात्र २०११ ला तो कोची टस्कर्स केरलाकडून आयपीएलमध्ये खेळला. २०१२ आणि २०१३ साठी पुन्हा एकदा बेंगलोरने विनयला संघात घेतले.
विनयने २०१२ ला १९ विकेट्स, तर २०१३ ला २३ विकेट्स घेत त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. त्याने बेंगलोरकडून एकूण ७० सामने खेळले असून ८० विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण असे असतानाही त्याची कामगिरीही दुर्लक्षित राहिली.
विनय २०१३ नंतर भारतीय संघाकडून खेळला नसला तरी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. त्याने प्रथम श्रेणीमध्ये तब्बल ५०४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील त्याला एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जाते.
१. रॉस टेलर –
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रॉस टेलर आयपीएलमध्ये २०१४ पर्यंत ४ संघांकडून खेळला. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, राजस्थान रॉयल्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि दिल्ली डेअरडेविल्स अशा चार संघांकडून खेळला. अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या टेलरला आयपीएलमध्ये खास छाप पाडता आली नाही.
तो २०१४ पर्यंतच आयपीएलमध्ये खेळला. त्यातील पहिले ३ मोसम म्हणजेच २००८, २००९ आणि २०१० चा मोसम तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला. तो बेंगलोरकडून एकूण ३१ सामने खेळला. त्यात त्याने ४ अर्धशतकांसह ७३३ धावा केल्या. यावेळी त्याचा १४८ एवढा स्ट्राईकरेटही होता. परंतू बेंगलोर संघातून बाहेर पडल्यानंतर मात्र त्याला खास काही करता आले नाही. त्याने २००९ च्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध केलेली ३३ चेंडूतील ८१ धावांची खेळी अनेक क्रिकेटप्रेमींच्या लक्षात असेल. पण असे असतानाही तोही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या चर्चेत बऱ्याचदा दुर्लक्षित राहत असल्याचे दिसून येते.
टेलरने आयपीएलमध्ये २०१४ नंतर खेळले नसले तरी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही खेळत असून तो क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० पेक्षा अधिक सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू आहे. तसेच तो न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी धावा करणाराही तो फलंदाज आहे.
ट्रेंडिंग लेख –
या ३ अंपायर्सचं नाव जरी घेतलं तरी भारतीय चाहते म्हणतात, नको रे बाबा
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळलेले ११ भारतीय, आज असतात तरी कुठे
३ षटकांत शतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज, मारले होते तब्बल २९ चौकार