कसोटी क्रिकेटमध्ये देशाकडून खेळायला मिळावे हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. तर आपल्या देशाच कसोटीत नेतृत्त्व करायला मिळणे हा मोठाच सन्मान असतो. यामुळे आपण जर यादी पाहिली तर वनडेत एखाद्या देशाचे कितीही कर्णधार झाले तरी कसोटीत अतिशय मोजक्या खेळाडूंनी देशाचे नेतृत्त्व केलेले असते.
अशातच एखादा खेळाडू जर वयाची २३ वर्ष पुर्ण करण्यापुर्वीच कसोटी संघाचा कर्णधार होत असेल तर ती केवढी मोठी गोष्ट आहे हे वेगळं सांगायला नकोच. अनेक खेळाडू हे आजकाल आंतरराष्ट्रीय पदार्पणचं वयाच्या २४-२५नंतर करत असाताना वयाच्या २३व्या वर्षी कुणी कर्णधार झाले असेल तर तो फक्त सन्मान नसून संघ व्यवस्थापनाने आपल्यावर ठेवलेला सर्वात मोठा विश्वास आहे.
या लेखात आपण जागतिक क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंनी कमी वयात संघाचे नेतृत्त्व केले अशा कर्णधारांची माहिती घेणार आहोत. (5 Youngest captains in Test cricket)
५. ग्रॅमी स्मिथ-
ग्रॅमी क्रेन स्मिथ हा जगातील सर्वाधिक कसोटी खेळणारा व सर्वाधिक कसोटी जिंकणारा कर्णधार आहे. वयाच्या २२व्या वर्षा दक्षिण आफ्रिकेसारख्या जगातील एका मोठ्या संघाचे त्याने नेतृत्त्व केले होते. तेव्हा तो जगातील तिसरा सर्वात तरुण कर्णधार राहिला आहे. तर सध्या तो या यादीत ५व्या स्थानावर आहे. २२ वर्षे आणि ८२ दिवसांचा असताना ढाका चितगाव कसोटीत २४ एप्रिल २००३ रोजी त्याने बांगलादेशविरुद्ध कसोटीत संघाची सुत्र हाती घेतली होती. ही कसोटी मालिका स्मिथच्या नेतृत्त्वाखाली २-०ने दक्षिण आफ्रिकेने जिंकली. त्यावेळी जगभरातील माध्यमांनी स्मिथला कर्णधार करण्याच्या निर्णयावर मोठं-मोठे लेख लिहीले होते व काही माध्यमांनी टिकाही केली होती. पुढे याच स्मिथने कसोटी कारकिर्दीत एकूण ११७ कसोटी सामने खेळताना यातील तब्बल १०९ सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्त्व केले. म्हणजे फक्त खेळाडू म्हणून तो केवळ ८ सामने खेळला. तेही वयाची २२ पुर्ण होण्यापुर्वी. या १०९ सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेला ५३ विजय मिळवुन दिले तर २९ पराभव दक्षिण आफ्रिकेला पहावे लागले. २७ सामने अनिर्णित राहिले. त्याची जिंकण्याची टक्केवारी ४८.६२ तर पराभूत होण्याची टक्केवारी २६.६० होती.
४. वकार युनूस
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनुस हा वयाच्या २२ वर्ष आणि १५ दिवसांचा असताना पाकिस्तानचा कर्णधार झाला होता. कसोटीत तेही कर्णधार तेही गोलंदाज असताना आणि तेही एवढ्या कमी वयात होणे ही नक्कीच छोटी गोष्ट नव्हती. विशेष म्हणजे तेव्हाच्या पाकिस्तान संघात इंझमाम उल हक, जावेद मियाॅंदाद, राशिद लतिफ, मुश्ताक अहमद व आमीर सोहेलसारखे दिग्गज खेळाडू भरले होते. पाकिस्तानकडून हा खेळाडू एकूण ८७ कसोटी सामने खेळला त्यात त्याने पुढे ३७३ विकेट्स घेतल्या. तो कसोटीत पाकिस्तानकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरा आहे.
१९९३-९४मध्ये झिंबाब्वेविरुद्ध कराची कसोटीत त्याने हे कर्णधारपद स्विकारले होते. त्याच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानने १७ कसोटीत १० विजय व ७ पराभव पाहिले. १९९३ ते २००३ या काळात तो पाकिस्तानच्या कर्णधारपदावर राहिला. त्याच्या या काळात पाकिस्तानने वेगवेगळ्या ७ खेळाडूंना कर्णधारपदावर संधी दिली.
३. मन्सुर अली खान पतौडी
भारताचे महान क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांनी २३ मार्च १९६२ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारली. तेव्हा ते कर्णधार म्हणून आपला पहिला सामना ब्रिजस्टोन येथे खेळले. विंडीजने हा सामना १ डाव व ३० धावांनी जिंकला होता.
पतौडी जेव्हा कर्णधार झाले तेव्हा ते जगातील सर्वात तरुण कसोटी कर्णधार होते व हा विक्रम त्यांच्या नावावर ६ मे २००४पर्यंत राहिला.
जेव्हा भारतीय संघाची संघबांधणी सुरु होती तेव्हा त्यांनी कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारली होती. त्यांनी भारताकडून ४० कसोटीत सामन्यात नेतृत्त्व करताना ९सामने जिंकले तर १९ पराभव व १२ अनिर्णित सामने टीम इंडियाच्या पदरात पडले.
२. ततेंदा तैबू
आज जी पिढी तिशी पार केलेली आहे त्यांना ततेंदा तैबू हे नाव माहित नसेल असं होणार नाही. झिंबाब्वे संघाची धुरा २० वर्ष आणि ३५८ दिवसांचे असताना तैबूने सांभाळली. ६ मे २००४ रोजी तो झिंबाब्वे संघाचा श्रीलंकेविरुद्ध हरारे कसोटीत कर्णधार झाला. ग्रॅमी स्मिथप्रमाणेच तैबूच्या कर्णधारपदाने जगातील माध्यमांचे व क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. तेव्हाचा झिंबाब्वे संघ तसाही एक मजबूत संघ म्हणूनच ओळखला जात होता. तैबूचा जो सामना कर्णधार म्हणून पदार्पणाचा होता तो सध्या खेळत असलेल्या ब्रेंडन टेलरचा कसोटी पदार्पणाचा ठरला होता. तैबूच्या नेतृत्त्वाखाली झिंबाब्वेने एकूण १० कसोटी सामने खेळले. त्यात ते ९वेळा पराभूत झाले तर १ सामना अनिर्णित राहिला. २००१ ते २०१२ या काळात तैबू कसोटीत एकूण २८ सामने खेळला. चर्चमध्ये परमेश्वराची सेवा करायची असल्याकारणाने वयाच्या २९व्या वर्षी तैबूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
१. राशिद खान
अफगाणिस्तान हा २०१८मध्ये कसोटी खेळणारा जगातील १२वा संघ व ११वा देश ठरला होता. बेंगलोरला भारताविरुद्ध अफगाणिस्तान आपला पहिला कसोटी सामना खेळला. अफगाणिस्ताने २०१८ पासून आजपर्यंत एकूण ४ कसोटी सामने खेळला असून यातील पहिल्या दोन सामन्यात अझगर स्टॅनिक्झाईने कर्णधारपद भुषविले तर पुढील दोन सामन्यात राशिद खानला संघाचे कर्णधारपद भुषविण्याची संधी मिळाली.
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश चितगाव कसोटीत ५ सप्टेंबर २०१९ रोजी तो कसोटी इतिसातील जगातील सर्वात तरुण कर्णधार झाला. तेव्हा त्याचे वय २० वर्ष ३५० दिवस होते. ततेंदा तैबूचा विक्रम त्याने केवळ ८ दिवसांनी मोडला होता. त्याने १५ वर्षांपुर्वीचा तैबूचा हा विक्रम मोडला होता.
आकडेवारीवर आधारीत काही मनोरंजक लेख-
–सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे ५ कर्णधार
–टाॅप ५- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले दिग्गज
–टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी
–सध्या खेळत असलेले ५ खेळाडू ज्यांनी मिळविल्या आहेत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच
–टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब
–टाॅप १०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू