fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये शतक करणारे ५ क्रिकेटपटू

5 youngest centurions in the IPL over the years

२००८ पासून सुरु झालेल्या इंडियन प्रीमीयर लीगमध्ये आत्तापर्यंत अनेक खेळाडू खेळले. आयपीएलमुळे अगदी नवीन युवा खेळाडूंना स्टार आणि दिग्गज खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधीही उपलब्ध झाली. आयपीएल अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा देखील ठरला आहे.

या १२ वर्षात अनेक फलंदाजांनी त्यांच्या खेळीने एक वेगळी छाप पाडली. काही खेळी तर अशा होत्या ज्या कायमच्या क्रिकेट चाहत्यांच्या आठवणीत राहिल्या.

तरीही टी२० क्रिकेट म्हटले की शतकी खेळी करणे मोठी गोष्ट मानली जाते. तरीही आत्तापर्यंत आयपीएलमध्ये खेळलेल्या खेळाडूंपैकी आत्तापर्यंत ३४ खेळाडूंनी शतकी खेळी केल्या आहेत. यात काही युवा खेळाडूंचा समावेश आहे. अशाच आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतकी खेळी करणाऱ्या ५ खेळाडूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतक करणाऱ्या पहिल्या ५ फलंदाजांमध्ये ४ फलंदाजांनी दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळताना ही कामगिरी केली आहे.

५. डेव्हिड वॉर्नर – २३ वर्षे १५३ दिवस

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ४ शतके केली आहेत. यातील पहिले शतक त्याने २०१० ला दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना २९ मार्चला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध केले होते. त्या सामन्यात त्याने प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीकडून सलामीला फलंदाजी करताना ६९ चेंडूत १०७ धावांची खेळी केली. यात त्याने ९ चौकार आणि ५ षटकार मारले होते.

त्यावेळी वॉर्नरचे वय २३ वर्षे १५३ दिवस इतके होते. त्यामुळे त्यावेळी तो आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण परदेशी खेळाडू देखील ठरला होता. त्या सामन्यात त्याच्या शतकाच्या जोरावर दिल्लीने १७७ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रतिउत्तरादाखल कोलकाताला १३७ धावाच करता आल्या होत्या.

४. क्विंटॉन डिकॉक – २३ वर्षे १२२ दिवस

दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटॉन डिकॉकने आयपीएलमध्ये अनेकदा चांगल्या खेळी केल्या आहेत. पण यातील त्याने १७ एप्रिल २०१६ ला दिल्ली डेअरडेविल्सकडून रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध केलेली शतकी खेळी अनेकांच्या लक्षात असेल. त्याने त्या सामन्यात बेंगलोरने दिलेल्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला ५१ चेंडूत १०८ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने १५ चौकार आणि ३ षटकार मारले होते.

त्यावेळी तो २३ वर्षे १२२ दिवसांचा होता. त्यामुळे त्याने त्यावेळी आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण परदेशी खेळाडू होण्याचा मान मिळवत वॉर्नरचा विक्रम मोडला होता. त्या सामन्यात डिकॉकच्या शतकामुळे दिल्लीने सहज ७ विकेट्सने विजय मिळवला.

३. संजू सॅमसन – २२ वर्षे १५१ दिवस

आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे त्यानेही ही कामगिरी दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना केली आहे. २०१७ मध्ये स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध खेळताना संजूने ११ एप्रिलला ६३ चेंडूत १०२ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ५ षटकार मारले.

त्यावेळी त्याचे वय २२ वर्षे १५१ दिवस इतके होते. त्याच्या या शतकामुळे दिल्लीने त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २०५ धावांचा डोंगर उभा केला होता. याच्या प्रतिउत्तरादाखल पुण्याचा डाव १०८ धावांवरच संपुष्टात आला होता.

२. रिषभ पंत – २० वर्षे २१८ दिवस

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. त्याने आयपीएलमधील त्याचे पहिले शतक १० मे २०१८ ला दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध केले होते. त्यावेळी त्याचे वय २० वर्षे २१८ दिवस इतके होते.

त्या सामन्यात रिषभने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ६३ चेंडूत नाबाद १२८ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने १५ चौकार आणि ७ षटकार मारले होते. त्याच्या या नाबाद शतकामुळे दिल्लीने २० षटकात १८७ धावा करत हैद्राबादला १८८ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन(९२) आणि केन विलियम्सनने(८३) नाबाद अर्धशतके करत हैद्राबादला ९ विकेट्सने हैद्राबादला सहज विजय मिळवून दिला होता.

१. मनिष पांडे – १९ वर्षे २५३ दिवस

आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात शतकी खेळी करण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर मनिष पांडे आहे. त्याने २१ मे २००९ ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना डेक्कन चार्जर्सविरुद्ध ७३ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ११४ धावा केल्या होत्या. त्यावेळी तो आयपीएलमध्ये शतक करणारा पहिला भारतीय तर ठरला होताच त्याचबरोबर आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाजही ठरला होता.

त्यावेळी त्याचे वय १९ वर्षे २५३ दिवस इतके होते. आजही त्याचा हा विक्रम अबाधित आहे. त्याच्या या शतकामुळे बेंगलोरने त्या सामन्यात २० षटकात १७० धावा करत डेक्कनला १७१ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कनला २० षटकात १५८ धावाच करता आल्या. त्यामुळे बेंगलोरने १२ धावांनी विजय मिळवला.

वाचनीय लेख –

सोशल मीडियावर सर्वाधिक चलती असलेले ५ भारतीय क्रिकेटर, पहा कोण आहे तिसऱ्या क्रमांकावर

दोस्ती! एकत्र सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या जगातील ५ जोड्या, दोन आहेत भारतीय

होय आम्ही भूत पाहिले! भूत पाहिल्याचा दावा करणारे जगातील ५ क्रिकेटर्स

You might also like