रविवारी (४ एप्रिल) ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलिया महिला संघाने मोठा विश्वविक्रम केला आहे.
मेग लेनिंग कर्णधार असलेल्या ऑस्ट्रेलियन महिला संघाचा हा सलग २२ वा वनडे विजय होता. त्यामुळे महिला आणि पुरुष क्रिकटमध्ये सर्वाधिक सलग वनडे विजय मिळवण्याचा विक्रम लेनिंगच्या ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या नावावर नोंदवला गेला आहे. यापूर्वी विक्रम रिकी पॉटिंग कर्णधार असलेल्या ऑस्ट्रेलिया पुरुष संघाच्या नावावर होता. पण आता त्यांचाच विक्रम त्यांच्या देशाच्या महिला संघाने मोडला आहे.
रिकी पॉटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया पुरुष संघाने २००३ साली जानेवारी ते मे महिन्यांदरम्यान सलग २१ वनडे सामने जिंकले होते. त्यांचा हा विक्रम तब्बल १७ वर्षांनी मोडण्यास ऑस्ट्रेलिया महिला संघाला यश आले आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघ लेनिंगच्या नेतृत्वाखाली २०१७ पासून वनडेत अपराजित आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाने शेवटचा वनडेमध्ये पराभव २९ ऑक्टोबर २०१७ साली पाहिला आहे. त्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत एकदाही पराभव पाहिलेला नाही.
Can't stop, won't stop ????????
Congratulations on a new world record, @AusWomenCricket! ???? pic.twitter.com/Hx8obWYiUW
— ICC (@ICC) April 4, 2021
वनडे मालिकेत आघाडी
ऑस्ट्रेलियन महिला संघाने रविवारी झालेल्या सामन्यात २१३ धावांचा पाठलाग ३८.३ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केला. त्यांच्याकडून एलिसा हेली (६५), एलिस पेरी (५६) आणि ऍश्ले गार्डनर(५३) यांनी अर्धशतके झळकावली. न्यूझीलंडकडून चार गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना लॉरेन डाऊनच्या ९० धावांच्या खेळीच्या जोरावर ४८.५ षटकात सर्वबाद २१२ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शटने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने मिळवलेल्या या विजयामुळे त्यांनी ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईत कोरोनाचा धोका वाढला तर ‘या’ शहरात खेळवण्यात यावे सामने, दिग्गजाने पुढे केला मदतीचा हात
आयपीएलमध्ये खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास कसे करणार पुनरागमन? जाणून घ्या नियम