अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या पाचव्या आणि निर्णायक टी२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला धूळ चारली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना भारताने २२४ धावांचा डोंगर उभारला होता. या लक्ष्याचा पाठलाग करतांना नमस्कार इंग्लंडला निर्धारित २० षटकांत ८ बाद १८८ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने ३६ धावांनी हा सामना खिशात घातला. तसेच या विजयासह पाच सामन्यांची टी२० मालिका देखील ३-२ अशा फरकाने जिंकण्यात यश मिळवले.
या सामन्यात भारताचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांचे मोलाचे योगदान होते. विराट कोहलीने रोहित शर्मासह सलामीला येण्याचा निर्णय घेत आधी फलंदाजीत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. त्यानंतर गोलंदाजी करत असतांना नेतृत्व करण्याबाबत त्या दोघांचा समन्वय भारताला विजयाकडे घेऊन गेला. त्यामुळे सामन्यानंतर या दोघांची बॉन्डिंग हा चर्चेचा विषय ठरला होता.
वादावर पडदा पडल्याची चिन्हे
गेले काही महिने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद असल्याची चर्चा जोर धरत होती. आयपीएलमध्ये रोहित शर्माला दुखापत झाल्यानंतर त्याची ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी निवड करण्यात आली नव्हती. मात्र आयपीएलच्या अंतिम सामन्यात रोहितने भाग घेतल्याने या दुखापतीच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यातच कोहलीला याबाबत विचारले असता रोहितच्या दुखापतीबद्दल पुरेशी माहिती दिली जात नसल्याची तक्रार त्याने केली होती. त्यामुळे या वादाला अधिकच तोंड फुटले होते.
त्यातच रोहित शर्माची आयपीएलमधील कर्णधार म्हणून यशस्वी कामगिरी पाहता त्याला भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व द्यावे, ही मागणीही जोर धरत होती. याच सगळ्या कारणांमुळे रोहित आणि विराट यांच्यात सारे काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र कालच्या सामन्यात दिसलेल्या बॉन्डिंगने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
फलंदाजीत केली कमाल भागीदारी
इंग्लंडविरुद्धच्या निर्णायक सामन्यात कोहलीने सलामीवीर केएल राहुलला वगळून टी नटराजनच्या रुपात एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला. आणि राहुलच्या ऐवजी स्वतःला सलामीला बढती देखील दिली. त्याचा हा निर्णय अतिशय अचूक ठरला. रोहित आणि विराटने एकमेकांना पूरक फलंदाजी करत भारताला भक्कम सलामी दिली. रोहितने आक्रमक पवित्रा स्विकारत इंग्लिश गोलंदाजांवर हल्ला चढवला तर कोहलीने दुसर्या बाजूने धावफलक हलता राहील याची खबरदारी घेतली. या ९४ धावांच्या सलामी दरम्यान दोघांमधील समन्वय अतिशय उत्तम होता.
नेतृत्वातही दिसले सामंजस्य
रोहित आणि विराट यांच्यातील बॉन्डिंग नेतृत्व करतानाही दिसून आले. कर्णधारपद कोहलीकडे असले तरी आपल्या अनुभवाने रोहित त्याला वेळोवेळी मदत करतांना दिसून आला. चौथ्या सामन्यात देखील दुखापतीमुळे कोहलीने काही काळासाठी मैदान सोडले होते, तेव्हा रोहितने कर्णधारपद सांभाळत भारताला विजय मिळवून दिला होता. पाचव्या सामन्यात पण रोहित आणि विराटने निर्णय घेतांना एकमेकांशी आणि गोलंदाजांशी चर्चा करून निर्णय घेतला. आणि त्यासह भारताचा सामन्याचा आणि मालिकेचाही विजय सुनिश्चित केला.
महत्वाच्या बातम्या:
टी२० मालिका गमावल्यानंतर मॉर्गनने केले मन जिंकणारे वक्तव्य, म्हणाला
जोस बटलरशी घातलेला वाद कोहलीला महागात पडणार? होऊ शकते ही कारवाई