आयपीएलमध्ये शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात कर्णधार एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा दिल्ली कॅपिटल्स कडून पराभव झाला. या हंगामात धोनीच्या संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. या हंगामातील सलामीचा सामना जिंकणार्या चेन्नईचा राजस्थान रॉयल्स आणि दिल्लीकडून पराभव झाला आहे. पराभव होऊनही शुक्रवारी झालेल्या सामन्यात सीएसकेच्या तीन खेळाडूंनी काही विक्रम केले आहेत. या विक्रमांवर नजर टाकूया.
193 सामने खेळून धोनीने केली रैनाची बरोबरी
आयपीएलमधील धोनीचा हा 193 वा सामना होता. त्याने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणार्या सुरेश रैनाची बरोबरी केली. धोनी चेन्नई संघासाठी 163 सामने खेळला आहे. तत्पूर्वी, धोनीने सलामीच्या सामन्यात मुंबईविरुद्धच्या विजयासह चेन्नईचा कर्णधार म्हणून आपला 100 वा विजय नोंदविला.
आयपीएलमध्ये डुप्लेसिसने पूर्ण केल्या 2000 धावा
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज फाफ डुप्लेसिसने 2000 धावा पूर्ण केल्या. या टी -20 लीगमध्ये आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या 4 खेळाडूंनी आयपीएलमध्ये 2000 धावा केल्या आहेत. डिविलियर्स, कॅलिस आणि ड्युमिनी यांनी यापूर्वी ही कामगिरी केली होती.
इतकेच नाही तर फाफ आता आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 2000 करणारा चौथा परदेशी खेळाडू बनला आहे. ही कामगिरी करण्यासाठी 67 डाव खेळला. टी20 चा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल (48 डाव), ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शॉन मार्श (52 डाव) आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसन (65 डाव) यांनी यापूर्वी 2000 धावा पूर्ण केल्या आहेत.
चेन्नईकडून वॉटसनच्या हजार धावा पूर्ण
शेन वॉटसनने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतांना 1000 पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने हे कामगिरी केली. त्याच्या आधी फाफ डुप्लेसिस, माईक हसी आणि मॅथ्यू हेडन या परदेशी खेळाडूंनी चेन्नईकडून ही कामगिरी केली आहे.