पुणे – शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथे सुरू असलेल्या क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीजच्या अंतिम फेरीत अहमदनगर व पालघर संघाने प्रवेश मिळवला. अहमदनगर संघाने सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर दुसऱ्या सेमी फायनल मध्ये पालघर संघाने कोल्हापूर संघाला पराभुत करत फायनल मध्ये प्रवेश मिळवला. उद्या सायंकाळी साडे पाच वाजता अहमदनगर विरुद्ध पालघर यांच्यात के. एम. पी. युवा कबड्डी सिरीजचा अंतिम सामना रंगेल.
पहिल्या सेमी फायनल मध्ये अहमदनगर संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सांगली संघाला ऑल आऊट करत आघाडी मिळवली. त्यानंतर मध्यंतरापूर्वी सांगलीच्या चढाईपटूंनी आक्रमकता दाखवत अहमदनगर संघाला चांगला प्रतिउत्तर देत ऑल आऊट केला. मध्यंतराला अहमदनगर संघाकडे 23-18 अशी आघाडी होती. दुसऱ्या हाफ मध्ये शिवम पठारे व आदित्य शिंदे यांनी चतुरस्त्र चढाया करत सामन्यावर पकड मजबूत करत अखेर सामना 50-34 असा जिंकत फायनल मध्ये प्रवेश मिळवला. अहमदनगर कडून चढाईत शिवम पठारे ने 15 व आदित्य शिंदे ने 13 गुण मिळवत अहमदनगर संघाच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली. अभिषेक पवार ने पकडीत 4 गुण मिळवले.
दुसऱ्या सेमी फायनल मध्ये पालघर संघाने बलाढ्य कोल्हापूर संघाचा धक्कादायक पराभव करत फायनल मध्ये प्रवेश मिळवला. सुरुवातीला पालघरच्या बचावपटूंनी उत्कृष्ट खेळ करत कोल्हापूरच्या चढाईपटूंना रोखला होता. तर मध्यंतरानंतर पालघरच्या प्रतिक जाधव ने चपळाईने गुण मिळवत पालघर संघाला पुन्हा एकदा रोमहर्षक विजय मिळवून दिला. पालघर कडून प्रतिक जाधव ने चढाईत 10 गुण मिळवले. तर पकडीत अभिनय सिंग ने 5, जीत पाटील ने 5 व प्रेम मंडळ ने 3 गुण मिळवले.
अंतिम सामना- अहमदनगर विरुद्ध पालघर
6 एप्रिल 2024, सायंकाळी 5:30 वाजता.