---Advertisement---

क्रिकेट आणि आकड्यांवरील प्रेमाचा मिलाफ

On: शनिवार, एप्रिल 11, 2020 8:41 AM
---Advertisement---

भाषांतर- आदित्य गुंड

सध्याच्या माहितीच्या युगात हातात स्मार्टफोन असल्याशिवाय, फेसबुक, ट्विटरवर आपण पाहत असलेल्या सामन्याविषयी अपडेट टाकल्याशिवाय, कॉमेंट केल्याशिवाय क्रिकेट पाहणे ही प्रक्रिया पूर्ण होऊच शकत नाही. कोहलीने धावांचा पाठलाग करताना आणखी किती विक्रम मोडीत काढले? किती चेंडूनंतर रोहित षटकार मारतोय? सामन्याच्या अखेरच्या षटकांत बुमराह किती निर्धाव चेंडू टाकतोय? यांसारख्या गोष्टी माहित असल्याशिवाय क्रिकेट पाहण्याची प्रक्रिया पूर्णत्वाला जात नाही. सामना सुरु असताना टीव्हीवर दिसणारे हे स्टॅट्स अगदी कुणीच नजरेआड करू शकत नाही.

आत्ता असे असले तरी अगोदर परिस्थिती अशी नक्कीच नव्हती. तेव्हा तर क्रिकेटच्या चाहत्यांना एखाद्या सामन्याचा स्कोअर जाणून घेण्यासाठी वर्तमानपत्रे, साप्ताहिकाची वाट पहावी लागे. सत्तरच्या दशकात मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात बी बी मामा नावाचे ज्येष्ठ सांखिकतज्ञ स्पोर्ट्सवीक नावाच्या साप्ताहिकातून अशी आकडेवारी चाहत्यांपर्यंत पोहोचवत असत. बीबी मामा त्यांनी गोळा केलेली आकडेवारी आपल्या संपादकांना पोस्टाने पाठवत आणि मग ती साप्ताहिकात प्रसिद्ध केली जाई असे म्हणतात. बीबी मामांचा प्रभाव त्यावेळी एका मुलावर पडला होता. तो मुलगा होता भारतातील सध्याचे आघाडीचे सांखिकीतज्ञ मोहनदास मेनन (Story of Mohandas Menon).

मेनन सांगतात, “मी बीबी मामांचा खूप मोठा फॅन होतो. साप्ताहिकात छापून येणारे त्यांचे लेख मी कापून ठेवत असे. या कात्रणांच्या शेजारी स्वतः गोळा केलेली माहिती लिहून मी माझे माहितीचे भांडार तयार करत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मी स्वतःची ही आवड अशी जोपासली तरी बरीच वर्षे ती आवडच राहिली होती.”

क्रिकेटची संस्कृती अनेक वर्षांपासून जोपासलेल्या मुंबईत शहरात मेनन लहानाचे मोठे झाले. सतत क्रिकेटच्या वातावरणात वाढलेल्या त्यांना आकडेवारीचे प्रेम जोपासणे त्यामुळे साहजिकच सोपे गेले.

“मुंबईत क्रिकेटशिवाय इतर कोणत्याही खेळाला एवढे प्रेम मिळत नाही. मुंबई सोडून इतर कुठे मी असतो तर माझी आकड्यांची ही आवड जोपासणे कदाचित शक्यही झाले नसते. मला कायम ऐतिहासिक आकडेवारी, तारखा यांच्याबद्दल आकर्षण होते. मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी हे आकडे कायम असत. अशातच नव्वदच्या दशकात मला चांगली संधी मिळाली.”

भारतात क्रिकेटच्या सामन्यांचे प्रक्षेपण तोपर्यंत दूरदर्शनवरच होत असे. तिथे अर्थात सामना दाखविण्याशिवाय इतर काही करायला फारसा वाव नव्हता. त्यामुळे सांखिकतज्ञ वगैरे तर लांबची गोष्ट. अशातच भारताने १९८३ च्या विश्वचषक जिंकला, त्यानंतर काही वर्षांनी सचिन रमेश तेंडुलकरनामक मुलाने सगळ्यांना वेड लावले. त्याचवेळी भारतीय क्रिकेटमध्ये जगमोहन दालमिया यांच्यासारख्या तद्दन व्यावसायिक विचार करू शकणाऱ्या प्रशासकाचा उदयही झाला. साहजिकच क्रिकेटला सुगीचे दिवस आले. याच दरम्यान १९९३ मध्ये ट्रान्स वर्ल्ड इंटरनॅशनल या कंपनीने बीसीसीआयकडून सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतले. यावेळी समालोचक म्हणून उदयास येत असलेल्या हर्षा भोगले यांच्या मदतीने मेनन यांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार होती.

मेनन सांगतात, “आता क्रिकेटचे सामने प्रक्षेपित होताना आकडेवारीही टीव्हीवर दिसू लागली. अशी आकडेवारी देत सामन्यांचे प्रक्षेपण करणारी पहिली कंपनी असल्याचा मान ट्रान्सवर्ल्ड इंटरनॅशनलने मिळवला. त्यांनी १९९४-९५ मध्ये दिल्लीत आपले कार्यालय थाटले आणि मी व्यासायिकदृष्ट्या क्रिकेटमध्ये ओढला गेलो.”

“हर्षाने माझी शिफारस केली आणि माझी व्यावसायिक कारकीर्द सुरु झाली. सुरुवात अर्थातच अडखळत होती. त्यावेळी जिलेट वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स नावाचा एक कार्यक्रम असे. ट्रान्सवर्ल्डने मला त्या प्रोजेक्टवर काम करायला सांगितले. मी १९८२ ते साधारण १९९५ पर्यंत रिलायन्समध्ये नोकरीला होतो. भारतात १९९६ मध्ये जो विश्वचषक झाला तेव्हापासून मी नोकरी सोडून पूर्णवेळ या क्षेत्रात येण्याचे ठरवले. नव्वदच्या दशकात अर्थशास्त्राचा पदवीधर असलेल्या मला पूर्णवेळ नोकरी सोडून या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेणे किती अवघड गेले असेल याची कल्पनाच केलेली बरी.”

“मी तेव्हा तिशीत होतो. रिलायन्समध्ये मी अॅडमीन आणि एचआर विभागात काम करत असे. हे काम करताना ट्रान्सवर्ल्डमधून विविध कामांसाठी मला अनेकदा बोलावणे येई, फोन येत . रिलायन्समध्ये पूर्णवेळ नोकरी करत असल्याने एकाचवेळी ह्या दोन्ही जबाबदाऱ्या पेलणे अवघड जाऊ लागले. ट्रान्सवर्ल्डकडून बरेच काम मिळत असल्याने मला विश्वास मिळाला आणि माझ्या कुटुंबियांशी चर्चा करून मी रिलायन्स सोडण्याचा निर्णय घेतला.”

क्रिकेटमधील ब्रॉडकास्टिंग क्षेत्र कात टाकून नव्या युगात प्रवेश करत होते. त्यामुळे हा निर्णय मेनन यांचे आयुष्य कायमचे पालटवून टाकणार होता.

“साधारण २००० च्या सुरुवातीस मला ईएसपीएनतर्फे भारताबाहेरील मालिका कव्हर करण्याची संधी मिळाली. त्यावेळी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी त्यांचे स्वतःचे वेगळे कार्यक्रम असत. इथेही हर्षा माझ्या मदतीला आला आणि मी ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडू शकलो. तोपर्यंत हे सगळं मी पूर्णवेळ करू लागलो होतो. माझे नशीब चांगले म्हणून मी योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी होतो.”

ईएसपीएन बरोबरचा करार २००८ मध्ये संपुष्टात आल्यावर मेनन यांनी नवा करार केला नाही. त्यांनी फ्रिलान्सर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यामुळे साहजिकच एकाचवेळी टेन स्पोर्ट्स, स्टार स्पोर्ट्स अशा अनेक वाहिन्यांबरोबर काम करण्याची संधी चालून आली. अशातच बीसीसीआयने स्वतःचे प्रॉडक्शन सुरु केल्यावर तर मेनन यांच्याकडे कामच काम येऊ लागले.

क्रिकेटचे सामने सुरु नसतात तेव्हा मेनन यांची बायको वल्सा त्यांना हे माहितीचे भांडार सांभाळण्यास मदत करते. मात्र सामने सुरु असताना मेनन एकटेच ही जबाबदारी पेलतात.

“मी एकट्याने काम करणे पसंत करतो कारण मला असेच काम करणे आवडते.”

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे हे मेनन यांना पटते.

“सध्याचे टीव्ही कव्हरेज पाहिले तर त्यात प्री-शो, पोस्ट-शो , स्टुडिओमधील शो असे अनेक प्रकार असतात. त्यामुळे सगळी माहिती एखाद्या ग्राफिक्सच्या रूपात सांगणे जास्त योग्य ठरते. दर्शकांना हे ग्राफिक्स समजणे जास्त सोपे असते. आकडेवारीची गंमत अशी आहे की तुम्हाला एखादी गोष्ट सांगायला पाच मिनिटे लागत असतील तर टीव्हीवर १० सेकंदासाठी दिसणाऱ्या ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्ही ती अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकता. ही ग्राफिक्स तुम्हाला समजायला अधिक सोपे असते”

एखादा मुरलेला फलंदाज जसा आता पुढचा चेंडू कसा असेल याचा अंदाज लावू शकतो तसेच काहीसे मेननही करतात. प्रचंड वेगाने पुढे जात असलेल्या सामन्यात पुढे काय होऊ शकते? याचा अंदाज चपखल बांधण्याची त्यांची क्षमता त्यांना या क्षेत्रात उत्तम बनवते.

“समोर अतिशय वेगाने उलगडत जाणाऱ्या घटनांमधून योग्य ती आकडेवारी शोधून काढणे हे माझे काम आहे. अनेकदा पुढे काय घडेल? याचा अंदाज घेऊन त्यानुसार आम्ही काम करतो. सध्या एखादी आकडेवारी शोधणे फार जिकिरीचे राहिलेले नाही. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मात्र सकाळी एखाद्याने काही विचारले तर त्याला माहिती पुरविण्यासाठी संध्याकाळ उजाडत असे.”

“इतकी वर्षे काम केल्याने एखादा समालोचक मला काय विचारेल याचा आता मला अंदाज येतो. मी अनेक समालोचकांबरोबर काम केले आहे. प्रत्येकाची आकडेवारी विचारण्याची पद्धत, त्यासाठीचे संभाषण आता माझ्या अंगवळणी पडल्याने काम सोपे होते. त्यांनी एखाद्या गोष्टीचा उल्लेख केला की हे संभाषण आता कोणत्या दिशेने जाणार आहे हे मला समजते. उदाहरण द्यायचे झाले तर जेव्हा सुनील गावसकर एखाद्या सामन्याविषयी बोलतात तेव्हा त्यांना काय माहिती लागणार हे मला माहित असते. मी लगेच त्या सामन्याचे स्कोअरकार्ड तयार ठेवतो. त्यांना अधिक माहिती हवी असल्यास मी त्यांना ती त्वरित पुरवतो.”

मेनन हे फक्त सामन्यांच्या वेळी कामात असतात असे नाही. अनेकदा संघांचे निवड समिती सदस्यदेखील त्यांचा पिच्छा पुरवतात. संघनिवड करताना एखाद्या खेळाडूची देशांतर्गत स्पर्धांमधील कामगिरी कशी आहे हे लक्षात घेणे गरजेचे असते. मध्यंतरी बीसीसीआयने माजी खेळाडूंसाठी पेन्शन योजना लागू केली होती. त्यावेळी मेनन यांनी अनेक माजी खेळाडूंना त्यांनी खेळलेल्या सामन्यांची संख्या पुरवत मदत केली होती. सध्या करोनामुळे सगळे सामने बंद आहेत. त्यामुळे आपल्या माहितीचे भांडार अद्ययावत करून घेण्याची आयतीच संधी मेनन यांना चालून आलेली आहे.

“आधी वर्षातले काही महिने क्रिकेटचा हंगाम असे. आता असे काही राहिले नाही. वर्षभर कुठे ना कुठे क्रिकेट सुरूच असते. आता तर बीसीसीआय देशांतर्गत सामन्यांचेही प्रक्षेपण करते. त्यामुळे भरपूर काम आहे. माझ्याकडे रणजी, दुलीप, इराणी या सगळ्या स्पर्धांच्या माहितीचा साठा आहे. अगदी भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरु होईपर्यंत मी स्टार स्पोर्ट्ससाठी रणजी करंडकाचे काम करत होतो.”

क्रिकेटमधील आकडेवारीचे हे क्षेत्र आता सर्वदूर जाऊन पोहोचले आहे. अनेक तरुण आता या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहू लागलेत. चाहत्यांकडून ह्या आकडेवारीला मागणी आहे याची त्यांना जाणीव आहे. मेनन यांनी सुरुवात केली तेव्हा मात्र असे नव्हते.

“या क्षेत्रात पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेणारा, ही जोखीम पत्करणारा मी भारतातला मी पहिला माणूस आहे मी विश्वासाने सांगू शकतो.” त्यावेळी पत्करलेल्या या जोखमीचे यश मेनन यांना मिळाले हे मात्र कुणीही नाकारू शकत नाही.

स्क्रोल डॉट इनवरील विनायक मोहनारंगन यांचा मूळ लेख या लिंकवर क्लिक करुन वाचा

गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान

 गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला

एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!

गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---