दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात दक्षिण आफ्रिकेत 4 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. टीम इंडियानं मालिकेतील पहिला सामना 61 धावांनी जिंकला. डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघानं एकतर्फी विजय मिळवला. मात्र या सामन्यातील एका भारतीय खेळाडूच्या कामगिरीनं टीम मॅनेजमेंटची चिंता वाढवली आहे.
उभय संघांमधील दुसरा टी20 सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यातून टीम इंडियाचा हा युवा खेळाडू बाहेर पडणार हे निश्चित मानलं जातंय. आम्ही येथे बोलतोय भारतीय संघाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्माबद्दल. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यानं अयशस्वी ठरतोय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात त्याला केवळ 7 धावा करता आल्या.
या 24 वर्षीय स्टार फलंदाजानं 5 महिन्यांपूर्वी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. टी20 विश्वचषकानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात त्याला संधी मिळाली होती. अभिषेक शर्मानं झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात स्फोटक शतक झळकावून आपल्या आगमनाची वार्ता जगाला दिली. त्यानं अवघ्या 46 चेंडूत शतक झळकावलं होतं. मात्र यानंतर तो सतत फ्लॉप ठरत आहे. गेल्या 6 डावात त्याला केवळ 65 धावाच करता आल्या आहेत.
झिम्बाब्वेविरुद्धच्या शतकानंतर अभिषेकला पुढच्या दोन सामन्यांमध्ये केवळ 10 आणि 14 धावा करता आल्या. यानंतर त्याची श्रीलंका दौऱ्यावर निवड झाली नाही. मात्र बांगलादेशविरुद्धच्या घरच्या टी20 मालिकेत त्याला पुन्हा संधी मिळाली. येथेही या युवा फलंदाजानं निराशा केली. या संपूर्ण मालिकेत खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांमध्ये त्याला 16, 15 आणि 4 धावाच करता आल्या. यानंतर अभिषेक शर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी20 मध्येही दुहेरी आकडा गाठता आला नाही.
अभिषेक शर्माला 9 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 8 डावात केवळ 166 धावा करता आल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध त्याची शतकी खेळी वगळली, तर या फलंदाजानं उर्वरित 7 डावांमध्ये केवळ 66 धावा केल्या. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 साठी त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, हे निश्चित मानलं जातंय.
हेही वाचा –
भारतीय संघात रिंकू सिंहवर अन्याय होतोय? माजी क्रिकेटपटूचा मोठा सवाल
टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम भारताच्या नावे, आजपर्यंत असं कोणताही संघ करू शकलेला नाही!
भारताचा व्हाईटवॉश! ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध ऋतुराज ब्रिगेडचा दारुण पराभव