संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सातव्या टी२० विश्वचषकाला शनिवारपासून (२३ ऑक्टोबर) पासून सुरुवात झाली. सुपर १२ फेरीचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रीका असा खेळला गेला. अबूधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाच गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असला तरी, दक्षिण आफ्रिकेच्या एडेन मार्करमने घेतलेल्या झेलाची चांगलीच चर्चा रंगली होती.
मार्करमचा अविस्मरणीय झेल
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ११९ धावांच्या प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. त्यांची अवस्था एक वेळ तीन बाद ३८ अशी झाली होती. त्यानंतर, अनुभवी स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांनी ४२ धावांची भागीदारी केली. सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला असतानाच एन्रिक नॉर्किए टाकत असलेल्या चौदाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्मिथने पुलचा फटका मारला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या एडेन मार्करमने उजव्या बाजूला धाव घेत सूर मारत एक शानदार झेल पकडला. त्याच्या या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/TweetsByArnav/status/1451897590111297541
फलंदाजी करतेवेळी दक्षिण आफ्रिकेचे इतर फलंदाज नांग्या टाकत असताना मार्करम एका बाजूला उभा होता. त्याने त्याने दक्षिण आफ्रिकेच्या डावात सर्वाधिक ४० धावांची खेळी केलेली. त्याच्याच खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ९ बाद ११८ धावा बनवलेल्या.
https://twitter.com/KirkatCrazy_/status/1451910403009642496
ऑस्ट्रेलियाचा पहिल्याच सामन्यात विजय
दुबई येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची अव्वल दर्जाची गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ११८ धावांमध्ये संपुष्टात आणला. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही तितकीच धारदार गोलंदाजी करताना सामन्यात रंगत निर्माण केली. अखेरच्या षटकात विजयासाठी आठ धावांची आवश्यकता असताना मार्कस स्टॉयनिसने दोन चौकार मारत ऑस्ट्रेलियाला दोन चेंडू राखून विजयी केले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या-
लाजवाब रशीद! दोन धावांत चार बळी टिपत बनवले विक्रमांचे इमले
टी२० विश्वचषक: इंग्लंडचा वेस्ट इंडिजवर ऐतिहासिक विजय, गतविजेत्यांना ६ विकेट्सने दिला पराभवाचा धक्का