दिल्ली। 19 वर्षाखालील कुच बिहार ट्रॉफीमध्ये मुंबईकर अर्जून तेंडुलकरने दिल्लीच्या 5 फलंदाजांना तंबूत पाठवले. फिरोजशहा कोटला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्याने गोलंदाजीत लय कायम राखत उत्तम कामगिरी केली.
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा असलेल्या अर्जूनवर अधिक जबाबदारी असल्याने तो गोलंदाजीत प्रभावशाली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 98 धावा देत पाच विकेट्स घेतल्या.
या सामन्यात अर्जूनने दिल्ली संघाचा कर्णधार आयुष बदोनी, वैभव कांडपाल, यष्टीरक्षक गुलजार सिंग संधू, रितिक शोकीन आणि प्रशांत कुमार भाटी यांना बाद केले. त्याच्या या भेदक गोलंदाजीपुढे दिल्लीचा संघ पहिल्या डावात सर्वबाद 396 धावाच करू शकला.
पहिली फलंदाजी करताना मुंबईने 453 धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये दिव्यांशने धडाकेबाज दुहेरी शतक करताना 211 धावा केल्या. तसेच प्रग्नेश कानपिलेवार आणि मनल कावले या दोघांनीही अर्धशतके केली.
दिल्लीकडून प्रियांश आर्याने 152 धावा करताना संघाला उत्तम सुरूवात करून दिली. मात्र अर्जूनने त्यांची मधली फळी कमकुवत केली.
चौथ्या दिवशी या सामन्याच्या दुसऱ्या डावात मुंबईने 155 धावा केल्या तर दिल्लीने 3 बाद 64 धावा केल्या. यावेळीही अर्जूनने आर्याची विकेट घेतली. हा सामना अनिर्णीत राहिला.
अर्जूनने यावर्षाच्या सुरूवातीला श्रीलंकेविरुद्ध 4 दिवसीय 2 कसोटी सामन्याच्या मालिकेत 19 वर्षाखालील भारतीय संघात पदार्पण केले.
महत्त्वाच्या बातम्या:
–सिक्युरीटी गार्डने पकडला कोहलीचा अफलातून षटकार, पहा व्हिडीओ
–कोहलीच्या झंझावातापुढे रोहितचा तो कारनामा कुणाच्या लक्षातही आला नाही
–विराट जगातील १११७ खेळाडूंना ठरला भारी, जाणून घ्या काय आहे कारण