पुणे। मेट्रोइट्स संघाने पीएमपी संघाला तर जनादेश संघाने ए के स्पोर्ट्स संघाला पराभूत करताना आझम महिला टी२० क्रिकेट स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.
आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या लढतीमध्ये मेट्रोइट्स संघाने पीएमपी संघाला ३१ धावांनी पराभूत केले. संजूला नाईकच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मेट्रोइट्स संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद ११६ धावांपर्यंत मजल मारली. संजूला नाईकने ३० चेंडूत ८ चौकारांच्या सहाय्याने नाबाद ५३ धावांची खेळी केली. तिला श्रेया परब हिने २४ (४ चौकार) धावा, इब्तीसम शेख हिने १२ (२ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. भोगी सर्वानी व प्रिया कोकरे यांनी प्रत्येकी २ तर चिन्मयी बोरफळे हिने एक गडी बाद केला.
मेट्रोइट्स संघाचे आव्हान पीएमपी संघाला पेलवले नाही. पीएमपी संघ १९.२ षटकांत सर्वबाद ८५ धावाच करू शकला. श्वेता जाधव हिने २३ (३ चौकार) तर वैष्णवी काळे हिने २० (१ चौकार) करताना लढत देण्याचा प्रयत्न केला. मिताली गावंदर, श्रेया परब, पूर्वा भईडकर व संजूला नाईक यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. अर्धशतक व २ गडी बाद करण्याऱ्या मेट्रोइट्सच्या संजूला नाईकला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्या लढतीत जनादेश संघाने ए के स्पोर्ट्स संघाला ६२ धावांनी पराभूत केले. भूमिका उंबरजेच्या दमदार आक्रमक फलंदाजीच्या जोरावर जनादेश संघाने निर्धारित २० षटकांत २ बाद १४७ धावसंख्या उभारली. भूमिका उंबरजेने केवळ ६५ चेंडूत १२ चौकारांच्या सहाय्याने ८१ धावा करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. तिला श्री राठोडने ३१ (५ चौकार) तर तेजल हसबनीसने १६ (१ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. अनन्या दर्शाळेने एक गडी बाद केला.
ए के स्पोर्ट्स संघाला निर्धारित २० षटकांत ८ बाद ८५ धावा करता आल्या. ए के स्पोर्ट्स संघाकडून अनन्या दर्शाळेने सर्वाधिक २४ धावांची (४ चौकार) खेळी केली. तिला भाविका अहिरेने २१ (३ चौकार) धावा करताना दिलेली लढत अपुरी ठरली. जनादेश संघाच्या श्रुती महाबळेश्वर हिने ३ गडी बाद करताना संघाला विजय मिळवून दिला. तिला तनुजा भोसले हिने २, भूमिका उंबरजे, तेजल हसबनीस व इशा पठारे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. जनादेश संघाच्या भूमिका उंबरजे हिला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
मयंक नाहीतर ‘हा’ असणार पंजाब किंग्सचा नवा कर्णधार?
‘कपडे घाला आणि निघा’, चारू शर्मांनी सांगितले अशी मिळाली मेगा लिलावात ऑक्शनरची जबाबदारी
‘रिल बनवण्यासाठी द्या आयडीया’, दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होताच वॉर्नरची पोस्ट चर्चेत