इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत रविवारी (दि. 21 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा प्रवास संपुष्टात आला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने आरसीबी संघाला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. तसेच, त्यांचे प्ले-ऑफमध्ये जाण्याचे स्वप्नही भंगले. अशातच आरसीबी संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याच्याविषयी धक्कादायक बातमी समोर येत आहे. बेंगलोर विरुद्ध गुजरात सामन्यादरम्यान विराटच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मैदानातून बाहेरही गेला होता. अशात आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकानुसार त्याच्या गुडघ्याला दुखापत आहे, पण ही चिंतेची बाब नाहीये. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी विराटच्या दुखापतीने चाहत्यांच्या चिंता वाढवल्या आहेत.
आरसीबी संघ आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभूत झाला. विराट कोहली (Virat Kohli) याने या सामन्यात खणखणीत शतक झळकावले होते. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना विराटने विजय शंकर याचा शानदार झेल घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. यादरम्यानच विराटच्या गुडघ्याला जखम झाली. विराटच्या मदतीसाठी फिजिओ आले, पण विराटला मैदान सोडावे लागले. तो शेवटची पाच षटके डगआऊटमध्ये बसून राहिला. विराट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघाविरुद्ध सलग दोन सामन्यात शतक ठोकले आहे.
आरसीबीचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी सामन्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “त्याच्या गुडघ्याला सामान्य दुखापत झाली आहे, पण मला वाटत नाही की, ही गंभीर आहे.” बांगर म्हणाले की, “त्याने चार दिवसांच्या आत सलग सामन्यात शतक झळकावले आहे, तो एक असा खेळाडू आहे, जो फलंदाजीतच नाही, तर क्षेत्ररक्षण करतानाही त्याचे योगदान देऊ इच्छितो. तो खूप धावला आहे. काही दिवसांपूर्वी खेळल्या गेलेल्या सामन्यात तो 40 षटके मैदानावर राहिला आणि इथे त्याने 35 षटके मैदानावर घालवली.”
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठीच्या संघात विराटचा समावेश
विराट कोहली याचा समावेश त्या सात भारतीय खेळाडूंमध्ये आहे, जे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 जूनपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यासाठी (World Test Championship 2023 Final) मंगळवारी (दि. 23 मे) इंग्लंडला रवाना होणार आहेत. काऊंटी क्रिकेट खेळत असलेला कसोटी तज्ञ चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्येच संघाशी जोडला जाईल. डब्ल्यूटीसी (WTC) स्पर्धेचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून यादरम्यान खेळला जाणार आहे. हा सामना इंग्लंडच्या के ओव्हल मैदानावर पार पडणार आहे. (batting coach sanjay bangar give big update on virat kohli injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठ्या मनाचा कोहली! जबरदस्त शतकानंतर गिलला मारली मिठी, दु:ख विसरून मनापासून केलं कौतुक
संतापजनक! आरसीबीच्या पराभवानंतर चाहत्यांनी सोडली पातळी, मॅचविनर गिल अन् त्याच्या बहिणीला केली शिवीगाळ