२००८ पासून सुरु झालेल्या इंडियन प्रीमीयर लीगमध्ये आत्तापर्यंत अनेक खेळाडू खेळले. आयपीएलमुळे अगदी नवीन युवा खेळाडूंना स्टार आणि दिग्गज खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची संधीही उपलब्ध झाली. आयपीएल अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा देखील ठरला आहे. या १२ वर्षात अनेक फलंदाजांनी त्यांच्या खेळीने एक वेगळी छाप पाडली. तसेच अनेक खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी आयपीएल हा मोठा मंच ठरला. जसप्रीत बुमराह, आर अश्विन अशा काही खेळाडूंचा समावेश आहे.
परंतु यावर्षी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएलच्या आयोजनावर टांगती तलवार होती. पण आता आयसीसीने यावर्षी होणारा टी२० विश्वचषक पुढे ढकलल्यामुळे आता आयपीएल २०२० चा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चाहत्यांना अनेक मोठ्या क्रिकेटपटूंना पुन्हा मैदानात पाहण्याची संधी मिळणार आहे. याबरोबर हा आयपीएल मोसम अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांना यामार्फत त्यांच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची आशा आहे.
यावर्षी आयपीएल कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारतात होणार नसून युएईमध्ये १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान होणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेलने म्हटले आहे.
या लेखात अशा ५ खेळाडूंचा आढावा घेतला आहे, ज्यांना आयपीएलमार्गे त्यांच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची आशा आहे.
१. सुरेश रैना (Suresh Raina)
देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून सुरेश रैना भारतीय संघात परत येण्यासाठी प्रयत्न करत आहे. जुलै २०१८ मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर निवड समिती सतत त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. परंतु, आयपीएल २०२० मध्ये जर रैनाची कामगिरी उत्तम राहिली तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतू शकतो.
सुरेश रैना भारतीय संघासाठी आतापर्यंत २२६ वनडे सामने खेळला असून यामध्ये त्याने ३५.३१ च्या सरासरीने ५६१५ धावा केल्या आहेत. त्याची कसोटी कारकीर्द इतकी खास राहिली नाही. त्याने भारतासाठी १८ कसोटी सामन्यांमध्ये २६.४८ च्या सरासरीने ७६८ धावा केल्या आहेत.
टी२० क्रिकेटमध्ये सुरेश रैनाची कामगिरी खूप प्रभावी आहे. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट कारकीर्दीत त्याने ७८ सामने खेळले असून त्यात त्याने २९.१६ च्या सरासरीने १६०४ धावा केल्या आहेत.
२. ख्रिस लिन (Chris Lynn)
ऑस्ट्रेलिया संघाचा फलंदाज ख्रिस लिन हा बर्याच काळापासून ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातून बाहेर होता. २०१८ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाकडून अखेरचा सामना खेळला होता. परंतु ख्रिस लिनने आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्सकडून चांगली कामगिरी बजावल्यास तो पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघात खेळताना दिसू शकेल.
ख्रिस लीन गेल्या मोसमपर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत होता, पण आयपीएल २०२० च्या लिलावात त्याला मुंबई इंडियन्सच्या संघाने दोन कोटींची बोली लावून विकत घेतले आहे. लीन स्पोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.
३. एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers)
२०१८ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. तो जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. आयपीएलमध्ये तो आरसीबीकडून खेळत आहे. गेल्या वर्षभरात तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये परतण्याची बरीच चर्चा आहे.
एबी डिव्हिलियर्सने आपल्या देशासाठी ७८ आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट सामनेही खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २६.१२ च्या सरासरीने १६७२ धावा केल्या आहेत. तो आता जगभरातील टी-२० क्रिकेट लीगमध्ये भाग घेतो.
जर त्याने आयपीएल २०२० मध्ये चांगली कामगिरी केली तर दक्षिण आफ्रिका बोर्ड त्याला पुन्हा एकदा टी२० क्रिकेट संघात खेळण्याची संधी देऊ शकेल. त्याने स्वत: अनेक मुलाखतींमध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
४. एमएस धोनी (MS Dhoni)
मागील काही महिन्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या क्रिकेटपटूंमध्ये एमएस धोनीचाही समावेश आहे. २०१९ विश्वचषकानंतर त्याच्या भविष्याविषयी अनेकदा विविध मते मांडली गेली. अनेकांना तो २०१९ विश्वचषकानंतर निवृत्त होईल असे सर्वांना वाटत होते. परंतु आतापर्यंत त्याने निवृत्तीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण विश्वचषकानंतर तो मैदानात उरलेला दिसला नाही. तसेच आयपीएमार्गे तो भारतीय संघातही पुनरागमन करु शकतो अशी चर्चा होती.
भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवडकर्ते यांनी एमएस धोनीबद्दल बोलताना सांगितले की, आयपीएल २०२० मध्ये जर धोनीने चांगली कामगिरी केली तर त्याचा टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी विचार केला जाईल. जर आयपीएल २०२० मध्ये धोनीने चांगली कामगिरी केली गेली तर तो पुन्हा एकदा भारतीय संघाच्या जर्सीमध्ये मैदानात दिसू शकेल.