भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0ने पराभूत केले. यानंतर आता वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्यासाठी खूपच खास असणार आहे. विराट कोहली या मालिकेत धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (दि. 27 जुलै) बार्बाडोस येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी आपण विराट कोहलीची वेस्ट इंडिजविरुद्धची आकडेवारी पाहूयात. ही आकडेवारी मालिकेपूर्वीच वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना घाम फोडू शकते.
वनडेत विराटचा दबदबा
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याची वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे क्रिकेटमधील आकडेवारी शानदार आहे. विराट 50 षटकांच्या क्रिकेट प्रकारात वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत 41 डाव खेळला आहे. यादरम्यान विराटच्या बॅटमधून 66.50च्या अफलातून सरासरीने तब्बल 2261 धावांचा पाऊस पडला आहे. एवढंच नाही, तर विराटने यादरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध 9 शतकांचा पाऊसही पाडला आहे. तसेच, यामध्ये 11 अर्धशतकांचाही समावेश आहे.
वेस्ट इंडिजमध्ये विराटची शानदार आकडेवारी
विराट वेस्ट इंडिज संघाला त्यांच्याच देशात घाम फोडण्यासाठी ओळखला जातो. असे आम्ही नाही, तर त्याची आकडेवारी सांगते. विराटने वनडेत वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत एकूण 15 डावात फलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याने 71.81च्या सरासरीने 790 धावा केल्या आहेत. यादरम्यान विराटने 4 शतके आणि 3 अर्धशतकेही झळकावली आहेत. म्हणजेच आकडेवारीनुसार, मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात विराट पुन्हा एकदा वादळी फलंदाजी करू शकतो.
कसोटीत चमकला विराट
विराट कोहली याने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध खेळलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतही जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 2 सामन्यात 98च्या सरासरीने 197 धावा चोपल्या होत्या. यामध्ये त्याच्या बॅटमधून परदेशात खेळताना 5 वर्षांनंतर शतकही निघाले होते. पहिल्या सामन्यात विराट 76 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने 121 धावांची शतकी खेळी साकारली होती. (cricketer virat kohli has tremendous record against west indies in odi cricket ind vs wi know here)
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतून भारताचा हुकमी एक्का बाहेर, धक्कादायक कारण आले समोर
गावसकर ‘या’ देशाला मानतात आपलं दुसरं घर, सुनील पुकारताच का होतात खुश? घ्या जाणून
MS Dhoniचे 11 वर्षांपूर्वीचे जॉब ऑफर लेटर व्हायरल, पगाराचा आकडा वाचून धक्काच बसेल