ऑस्ट्रेलिया संघाला रविवारी (दि. 08 ऑक्टोबर) भारतीय संघाकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. भारतीय संघाच्या या विजयाचे खरे हिरो विराट कोहली आणि केएल राहुल ठरले. दोघांनीही चौथ्या विकेटसाठी 165 धावांची जबरदस्त भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या हातून विजय हिसकावला. राहुलने षटकार मारून भारताला विश्वचषकातील पहिला सामना जिंकून दिला. त्याला सामन्यातील प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. असे असले, तरीही ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहली यालाही सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.
विराट सुवर्ण पदकाने सन्मानित
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत भारतीय संघ (Team India) सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप (T Dilip) सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला सुवर्ण पदक देण्याची घोषणा करताना दिसत आहेत.
📽️ BTS from the #TeamIndia 🇮🇳 dressing room 😃👌 – By @28anand
A kind of first 🥇 #CWC23 | #INDvAUS
And the best fielder of the match award goes to….🥁
WATCH 🎥🔽https://t.co/wto4ehHskB
— BCCI (@BCCI) October 9, 2023
दिलीप यांनी आधी ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांची प्रशंसा केली. त्यानंतर त्यांनी विराट कोहली (Virat Kohli) याची प्रशंसा करत त्याला सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून घोषित करतात. व्हिडिओत दिसते की, दिलीप विराटच्या गळ्यात सुवर्णपदक (Virat Gold Medal) घालत आहेत. तसेच, विराटही मजेशीर अंदाजात पदक दातांनी दाबत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. खरं तर, विराटने या सामन्यात मिचेल मार्श याचा शानदार झेल पकडला होता.
विराटची झंझावाती खेळी
विराटने एमए चिदंबरम स्टेडिअमच्या खेळपट्टीवर शानदार फलंदाजी केली. त्याने 116 चेंडूत 85 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी साकारली. विराटने त्याच्या खेळीत 6 चौकारही मारले. विराटने राहुलसोबत मिळून चौथ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी साकारली. तसेच, ऑस्ट्रेलियाला या सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवला.
राहुलची नाबाद 97 धावांची खेळी
विराटव्यतिरिक्त केएल राहुल याने अखेरपर्यंत टिच्चून फलंदाजी केली. त्याने 115 चेंडूंचा सामना करताना नाबाद 97 धावांची खेळी साकारली. त्याने या खेळीत 2 षटकार आणि 8 चौकारांची बरसात केली. राहुलने 42व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार मारत संघाला विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या सामन्यात विजयी केले. (cricketer virat kohli won gold medal for his best fielding effort against australia in dressing room icc world cup 2023)
हेही वाचा-
विराटचे जीवनदान नाही, तर ‘हा’ होता मॅचचा टर्निंग पॉईंट; जडेजाचा मोठा खुलासा
स्टोक्सच्या फिटनेसची तक्रार कायम! विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यातून माघार घेण्याची शक्यता, वाचा कधी करणार कमबॅक