भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे नेहमीच त्याच्या नेतृत्व गुणांसाठी कौतुक केेले जाते. त्याने भारताबरोबरच आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघालाही कर्णधार म्हणून मोठे यश मिळवून दिले आहे. तो नेहमीच युवा खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी ओळखला जातो. पण असे असतानाही मागीलवर्षी आयपीएलच्या १३ व्या हंगामावेळी त्याने युवा खेळाडूंमध्ये स्पार्क नसल्याचे वक्तव्य केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण आता याबद्दल चेन्नई सुपर किंग्सचा युवा क्रिकेटपटू एन जगदिसनने प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल २०२० स्पर्धा चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वात निराशाजनक ठरली होती. या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७ विकेट्सने पराभूत झाल्यानंतर धोनीने म्हटले होते की ‘युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नाही.’ यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
याबद्दल नुकतेच चेन्नईचा युवा यष्टीरक्षक फलंदाज एन जगदिशन स्पोर्टकिडाशी बोलताना म्हणाला की त्यावेळी धोनीचे वक्तव्य चूकीच्या अर्थाने घेतले गेले. तो म्हणाला, ‘धोनी खरंच नक्की काय म्हणाला, त्याचा मीडियाकडून पूर्णपणे चूकीचा अर्थ काढला गेला.’
तो पुढे म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे की हे युवा खेळाडूंबद्दल नव्हते. ऋतुराज आणि मी चांगली कामगिरी केली होती. लोकांना हे लक्षात येत नाही की तो असा व्यक्ती आहे जो सिनियर खेळाडूंनाच नाही तर संपूर्ण संघाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा तुमच्या संघात इतके दिग्गज खेळाडू असतात, तेव्हा तुम्ही प्रत्येकाला वेगळे काही सांगू शकत नाही. संघातील सिनियर खेळाडूंना बॅकअप करण्यासाठी काहीतरी करावे लागले आणि त्याच्या त्या वक्तव्यानंतर आम्ही चांगले खेळलो संघाची कामगिरी चांगली झाली.’
सीएसकेची आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी
आयपीएल २०२१ हंगाम कोरोनाच्या कारणामुळे २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित झाला. पण या हंगामात सीएसकेची कामगिरी चांगली झाली होती. त्यांनी पहिला सामना पराभूत झाल्यानंतर सलग ५ सामने जिंकले होते. त्यानंतर मात्र, त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. पण स्पर्धा स्थगित झाली तेव्हा सीएसके संघ ७ सामन्यांतील ५ विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता.
विशेष म्हणजे चेन्नईसाठी सहा महिन्यांपूर्वी युएईमध्ये पार पडलेला १३ वा आयपीएल हंगाम खराब ठरला होता. आयपीएल २०२० मध्ये चेन्नईने चौदा सामने खेळले. यामध्ये या संघाने केवळ ६ सामन्यात विजय मिळवला, तर ८ सामन्यात या संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं. त्यामुळे त्यांना गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तसेच त्यांना आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराहचे चाहते थेट आयर्लंडमध्ये देखील! ‘ही’ महिला क्रिकेटपटू मानते आदर्श
भारताचा ‘हा’ वेगवान गोलंदाज पुनरागमनासाठी सज्ज; आयपीएल संघाने केले ट्विट
“भारताच्या महिला क्रिकेटपटूंना प्लेयर्स असोसिएशनची नितांत गरज”, माजी खेळाडूचे प्रतिपादन