५ महिने क्रिकेटपासून दूर असलेला डेल स्टेन खेळणार या स्पर्धेत

या वर्षी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन खेळणार आहे. तो या लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळणार आहे. स्टेनचा हा बीबीएलचा पहिलाच मोसम असणार आहे. या पदार्पणाच्या मोसमात तो 6 सामने खेळणार आहे.

ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने स्टेनला 6 सामने खेळण्याची परवानगी दिली आहे. पण जर दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी स्टेनला दक्षिण आफ्रिका संघात संधी मिळाली नाही तर तो बीबीएलमध्ये 6 पेक्षा अधिक सामने खेळू शकतो. 

स्टेन व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचे एबी डीविलियर्स आणि ख्रिस मॉरिस हे देखील बीबीएलमध्ये खेळणार आहेत. डीविलियर्स ब्रिसबेन हीट संघाकडून तर मॉरिस सिडनी थंडर या संघाकडून खेळणार आहे.

स्टेनने ऑगस्टमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण तो मर्यादीत षटकांचे क्रिकेट पुढे खेळत राहणार आहे.

स्टेन हा  दक्षिण आफ्रिकेचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 439 विकेट्स घेतल्या आहेत.  2019 च्या आयपीएलनंतर स्टेन हा तब्बल सात महिन्यांनंतर डिसेंबरमध्ये होणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये दिसणार आहे.

You might also like