पुढील महिन्यात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची टी20 आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी काल(24 ऑक्टोबर) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
3 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारताच्या संघात पहिल्यांदाच 26 वर्षीय शिवम दुबेची निवड झाली आहे. अष्टपैलू क्रिकेटपटू असणाऱ्या शिवमचा फॉर्म सध्या चांगला आहे. त्याने सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना 8 सामन्यात 1 शतकासह 177 धावा केल्या आहेत. तसेच 5 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या शिवमच्या क्रिकेटचा श्रीगणेशा लहानपणी वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी झाला होता. तो चांगला क्रिकेट खेळतो हे अंधेरीमधील घरी काम करणाऱ्या एका नोकराने शिवमच्या वडीलांना सांगितले होते. त्यावेळी त्याच्या वडीलांनी त्याला क्रिकेटपटू बनवण्याचे ठरवले.
त्यासाठी त्यांनी घरातच खेळपट्टीही बनवून घेतली. तिथेच शिवम सराव करायचा. एवढेच नाही तर त्याचे वडील त्याला गोलंदाजी करायचे आणि तो फलंदाजी करायचा. त्याचे वडील रोज त्याच्यासाठी 500 चेंडू टाकायचे. तसेच तेच शिवमच्या डाएटचीही काळजी घ्यायचे. हे सर्व 10 वर्षांपर्यंत चालू होते.
त्यानंतर वयाच्या 14 व्या वर्षापासून शिवमने चंद्रकांत पंडीत यांच्याकडून प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. शिवमच्या क्रिकेटसाठी त्याच्या वडीलांना त्यांचा व्यवसायही विकावा लागला. पण शिवमने अखेर भारतीय संघात स्थान मिळवत त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या कष्टाचे चीज केले.
आयपीएलमध्ये मिळाली आरसीबीकडून खेळण्याची संधी –
शिवमला 2018 च्या आयपीएल लिलावात विराट कोहली कर्णधार असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने 5 कोटींची बोली लावत संघात घेतले. त्याने आयपीएलमध्ये एकूण 4 सामने खेळले असून 40 धावा केल्या आहेत.
शिवमने मारले आहेत 5 चेंडूत 5 षटकार –
मागीलवर्षी मुंबई विरुद्ध बडोदा संघात झालेल्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात शिवमने मुंबईकडून खेळताना दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाज स्वप्निल सिंगच्या षटकात पाच चेंडूत पाच षटकार मारले होते. त्यावेळी त्याने 60 चेंडूमध्ये 76 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने एकूण सात षटकार आणि तीन चौकार मारले होते.
विशेष म्हणजे शिवमने मुंबई टी20 लीगमध्ये प्रविण तांबेच्या गोलंदाजीवरही एकाच षटकात पाच षटकार खेचले आहे.
शिवमने आत्तापर्यंत 16 प्रथम श्रेणीचे सामने खेळताना 1012 धावा आणि 40 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने 35 सामन्यात 614 धावा आणि 34 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर शिवमने आत्तापर्यंत ट्वेंटी20 चे 19 सामने खेळले असून यामध्ये त्याने 242 धावा आणि 14 विकेट्स घेतल्या आहेत.