आयपीएल २०२१ मधील सातवा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने १४७ धावांचा पाठलाग करताना ३ गडी राखून विजय साजरा केला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला.
दिल्ली कॅपिटल्सच्या नावे नकोसा विक्रम
उभय संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. फलंदाजांसाठी नंदनवन मानल्या जाणाऱ्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सच्या धुरंदर फलंदाजांकडून चक्क एकही षटकार ठोकला गेला नाही. आयपीएलच्या १४ वर्षाच्या इतिहासात वानखेडे स्टेडियमवर एका डावात एकही षटकार न ठोकणारा दिल्ली कॅपिटल्स पहिला संघ बनला. दुसरीकडे याच सामन्यात दुसऱ्या डावात राजस्थानच्या फलंदाजांनी ७ षटकार मारले.
तीन सामन्यात मारले गेले आहेत इतके षटकार
आयपीएल २०२१ मध्ये वानखेडे स्टेडियमवर खेळला गेलेला हा तिसरा सामना होता. याच मैदानावर झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांनी मिळून १५ तर, राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यात तब्बल २३ षटकार फलंदाजांनी खेचले होते. अशाप्रकारे आतापर्यंत तीन सामन्यात मिळून या मैदानावर ४५ षटकार ठोकण्यात फलंदाज यशस्वी झाले आहेत.
राजस्थानचा रोमांचक विजय
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतच्या ५१ धावांच्या जोरावर निर्धारित २० षटकात १४७ धावा काढल्या. राजस्थानसाठी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकतने सर्वाधिक ३ बळी मिळविले.
प्रत्युत्तरात, डेव्हिड मिलर (६२) व ख्रिस मॉरिस (नाबाद ३६) यांच्या उपयुक्त खेळ्यांच्या जोरावर राजस्थानने हे आव्हान पार केले. जयदेव उनाडकत सामन्याचा मानकरी ठरला. राजस्थानचा हा स्पर्धेतील पहिला विजय आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रियान परागला मोलाचा सल्ला देताना विराट म्हणाला होता, ‘तू कधीही ऑरेंज कॅप जिंकू शकणार नाही, कारण…’