चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध केकेआर यांच्यादरम्यान आयपीएल २०२१ मधील दहावा सामना खेळला गेला. हा सामना आरसीबीने ३८ धावांनी जिंकून, सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. आक्रमक खेळी करणारा एबी डिव्हिलियर्स सामन्याचा मानकरी ठरला. या विजयासह आरसीबीने आयपीएलच्या चौदा वर्षाच्या इतिहासात प्रथमच एक अनोखी कामगिरी केली.
आरसीबीची खास कामगिरी
केकेआर विरुद्धच्या मोठ्या विजयानंतर आरसीबीने हंगामात सलग तिसरा विजय साजरा केला. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. आरसीबीने हंगामातील पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर तीन गडी राखून विजय मिळवला होता. तर, सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यांना ६ धावांनी विजय मिळालेला. यासह आरसीबीने आयपीएलच्या १४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच हंगामातील पहिले तिन्ही सामने जिंकण्याची कामगिरी केली.
आरसीबीचा मोठा विजय
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर कर्णधार विराट कोहली व रजत पाटीदार हे दुसऱ्या षटकात माघारी परतले. तिसऱ्या गड्यासाठी सलामीवीर देवदत्त पडिक्कल व ग्लेन मॅक्सवेल यांनी ८५ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने संघासाठी सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली. एबी डिव्हिलियर्सच्या ३४ चेंडूतील ७६ धावांमुळे आरसीबीने ४ बाद २०४ धावा उभारल्या.
प्रत्युत्तरात, केकेआरचे फलंदाज चांगल्या सुरुवातीनंतर ही नियमित अंतराने बाद होत राहिले. ओएन मॉर्गन, शाकिब अल हसन आणि आंद्रे रसेल यांनी केकेआरच्या विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, मोहम्मद सिराज व हर्षल पटेल यांच्या अखेरच्या दोन षटकातील किफायतशीर गोलंदाजीने सामना आरसीबीच्या पारड्यात गेला.
महत्त्वाच्या बातम्या –
“मॉर्गनच्या जागी भारतीय कर्णधार असता तर…”, गौतम गंभीरची संतप्त प्रतिक्रिया
चेन्नईला मागे टाकत बंगलोरचा खास विक्रम, ‘या’ यादीत गाठले अव्वल स्थान