जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला आठ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवामुळे कर्णधार विराट कोहलीवर सर्व बाजूंनी टीका होते आहे. आता यात वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंग यांची यात भर पडली आहे. होल्डिंग यांनी विराट कोहलीच्या स्वभावावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्याला एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे.
होल्डिंग यांनी कोहलीला दिला सल्ला
मायकल होल्डिंगने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, “विराट कोहली हा असा व्यक्ती आहे जो आपल्या मनातील विचार लगेच दुसऱ्या समोर मांडतो. कोहलीचा हा स्वभाव आहे. या बाबतीत विराट कोहली पूर्णपणे व्हिव रिचर्ड्स सारखा आहे. व्हिव रिचर्ड्स देखील मैदानावर खूप आक्रमक असायचा.”
मायकल होल्डिंग यांनी पुढे बोलतांना कोहलीला शांत राहण्याचा सल्ला दिलेला आहे. होल्डिंग पुढे म्हणाले की, “कोहलीच्या कर्णधार पदाबद्दल मागील इंग्लंड दौरा आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दरम्यान देखील मी हीच गोष्ट सांगितली होती. मी कोहलीबद्दल हे सांगू इच्छितो की, त्याने थोडेसे शांत राहिले पाहिजे. ज्यामुळे भारतीय संघ जरा आरामात खेळू शकेल. सध्या मला असे वाटत आहे की, भारतीय संघ हा खुंटीवर टांगल्याप्रमाणे खेळतो आहे.’
आयपीएलवर देखील व्यक्त केले मत
मायकल होल्डिंग यांनी यावेळी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये समालोचन न करण्यावर देखील भाष्य केले. मी टी20 क्रिकेटचा स्वीकार करत नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये समालोचन देखील करणार नाही”, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. “सध्या वेस्ट इंडिज संघातील अनेक खेळाडू राष्ट्रीय संघामध्ये खेळण्यासाठी उत्सुकता दाखवत नाहीत. जेव्हा तुम्ही सहा आठवड्यांमध्ये 6 ते 8 लाख डॉलर कमवत असाल, तर तुम्ही काय करताय? मी क्रिकेटपटूंना नाही तर प्रशासकांना दोष देत आहे. वेस्ट इंडिज संघ जर टी20 स्पर्धा जिंकत असेल तर ते क्रिकेट नाही”, असे होल्डिंग म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
एकमेवाद्वितीय! आजच्याच दिवशी चौदा वर्षांपूर्वी सचिन ठरला होता ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव क्रिकेटपटू
पदार्पणातच द्विशतक झळकलेल्या किवी फलंदाजाला लागणार लॉटरी? ‘हे’ आयपीएल संघ खरेदीसाठी उत्सुक