मुंबई । भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि माजी सलामीचा फलंदाज गौतम गंभीर यांच्यात वैचारिक मतभेद असल्याचे अनेकदा समोर आले आहेत. दरम्यान, क्रिकेट फॅन्सचे हृदय जिंकणारी माहिती समोर आली आहे. नुकतेच गौतम गंभीरने धोनीबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
गंभीर एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला, “आम्ही एक महिन्यापेक्षा जास्तवेळ रुममेट होतो. तेव्हा धोनीच्या डोक्यावरील केसांबाबत सतत चर्चा करत राहायचो. आम्ही दोघेही युवा होतो. त्यावेळी धोनीचे मोठे मोठे केस होते. इतके मोठे केस धोनी कसे राखतो, यावर आम्ही चर्चा नियमित करायचो.”
तो म्हणाला,” मला जमिनीवर झोपल्याचे दिवस देखील आठवणीत आहेत. कारण त्या वेळी आमच्या हॉटेलची खोली खूप छोटी होती. पहिल्या आठवड्यात आम्ही विचार करत होतो की ही खोली मोठी कशी केली जाईल. त्यावेळी आम्ही खोलीतील बेड बाहेर काढून तेथे गादी टाकून त्यावर आम्ही झोपू लागलो. ते खूपच चांगले दिवस. कारण आम्ही दोघेही युवा होतो.”
एमएस धोनीच्या केसांचे देशातच नव्हे तर विदेशात देखील फॅन होते. यात पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचा देखील समावेश आहे. केस खूपच चांगले आहेत ते न कापण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला होता.