क्रिकेटमध्ये ‘कॅचेस विन मॅचेस’ अशी एक म्हण आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी स्फोटक सलामीवीर हर्षेल गिब्स हा क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. जॉन्टी रोड्सनंतर तो दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जातो. गिब्स फलंदाजीत ज्या प्रकारे चौकार-षटकारांची आतिषबाजी करत, त्याचप्रकारे, क्षेत्ररक्षणात कमाल दाखवताना त्याने काही अविश्वसनीय झेल देखील घेतले आहेत. गिब्सने २४४ वनडे सामन्यांमध्ये १०८ झेल घेतले. परंतु, त्याचा एक न घेतलेला झेल आजही चर्चेत आहे. गिब्सने झेल सोडल्याने दक्षिण आफ्रिकेचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. आज या घटनेला २२ वर्ष पूर्ण झाली.
विजेतेपदाचा दावेदार दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिकेचा संघ १९९९ विश्वचषकात चांगलाच तगडा होता. या संघात गॅरी कर्स्टन, हर्षेल गिब्स, जॉन्टी रोड्स, हॅन्सी क्रोनिए, लान्स क्लूसनर, ऍलन डोनाल्ड, शॉन पोलॉक यांसारखे त्यावेळचे सर्वोत्तम खेळाडू खेळत. याच संघाकडे विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले गेलेले.
मित्रा तू वर्ल्डकप सोडलाय
सुपर सिक्स फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २७१ धावा केल्या. या सामन्यात गिब्सने १०१ धावांची धमाकेदार खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात अत्यंत वाईट झाली. ऍडम गिलख्रिस्टला स्टीव्ह एल्वर्दीने ५ धावांवर झेलबाद केले. तर, मार्क वॉ वैयक्तिक ५ धावांवर धावबाद झाला. डॅमियन मार्टिनसुद्धा काही खास करू शकला नाही. ऑस्ट्रेलियन संघाची अवस्था ३ बाद ४८ अशी झाली होती. त्यानंतर, सर्व जबाबदारी प्रतिभावान रिकी पॉन्टिंग आणि कर्णधार स्टीव्ह वॉ यांच्यावर होती. दोघांनीही हळूहळू डाव पुढे नेण्यास सुरुवात केली.
स्टीव्ह वॉ ५६ धावांवर खेळत होता, तेव्हा गिब्सने त्याचा मिड क्रिकेटला एक सोपा झेल सोडला. असे म्हटले जाते की त्याचवेळी वॉने गिब्सला म्हटले होते की, ‘मित्रा तू विश्वचषक सोडला आहेस.’ या जीवदानानंतर, वॉने नाबाद शतक झळकावले. सामनावीर ठरलेल्या वॉने ११० चेंडूंमध्ये १० चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १२० धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने हा सामना दोन चेंडू आणि पाच गडी राखून जिंकला.
"You've just dropped the World Cup."
A moment that went down in cricketing folklore in 1999, but will it win today's @bira91 @cricketworldcup Greatest Moments vote? pic.twitter.com/AqmGRl9WJ1
— ICC (@ICC) March 6, 2019
वॉर्नने केली होती भविष्यवाणी
आजतागायत गिब्सने हा झेल मुद्दाम सोडला की खरेच सुटला होता हा वाद संपलेला नाही. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने आधीच सांगितले होते की, गिब्स या सामन्यात झेल सोडेल आणि असेच घडले. यावर स्पष्टीकरण देताना वॉर्न म्हणाला होता की, गिब्सची झेल घेतल्यानंतर अतिघाईमध्ये आनंद साजरा करण्याची सवय मला माहीत होती आणि त्याच आधारावर मी हे बोललो होतो.
ऑस्ट्रेलियाने उंचावला विश्वचषक
उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दोघेही पुन्हा एकदा एकमेकांशी भिडले. नशीब आफ्रिकन संघाबरोबर नव्हते आणि सामना बरोबरीत सुटला. साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला हरवले असल्याने, टाय सामन्यामधूनही ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. गिब्सने स्टीव्ह वॉचा झेल पकडला असता तर, सुपर सिक्स फेरीतच ऑस्ट्रेलिया पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर असता. अखेरीस, ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला आठ गड्यांनी पराभूत करून दुसर्यांदा विश्वचषक जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
“लोक मला मिस्ट्री स्पिनर म्हणत असले तरी मी लेग स्पिनर”, भारतीय फिरकीपटूचे वक्तव्य
उलाढाल कोट्यावधींची! सेवा निवृत्तीनंतरही कॅप्टनकूल धोनी करतो ‘विक्रमतोड’ कमाई, पाहा कसं ते
‘केकेआरला ट्रॉफीची चिंता नाही, ते आयपीएलला गांभीर्याने घेत नाहीत,’ कुलदीपचे धक्कादायक भाष्य