भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या टी२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करत मालिकेवर कब्जा केला. भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली. या सामन्यात आज भारतीय संघाने नवीन सलामी जोडी मैदानात उतरवली. या जोडीने निर्णायक भागीदारी करत एक विक्रम आपल्या नावे केला.
कर्णधार व उपकर्णधार बनले सलामीवीर
मालिकेतील पहिल्या चार सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या केएल राहुलला संघ व्यवस्थापनाने आज विश्रांती दिली. त्यामुळे भारतीय संघासाठी कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा हे सलामीवीर म्हणून मैदानात उतरले. या दोघांनी प्रथमच भारतीय संघासाठी एकत्रितरीत्या सलामी दिली.
विराट-रोहित जोडीने आपल्या पहिल्याच सामन्यात ९ षटकात ९४ धावा झोडल्या. रोहितने या भागीदारीत सिंहाचा वाटा उचलत, अवघ्या ३४ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ६४ धावा फटकावल्या. तर, विराटने अखेरपर्यंत नाबाद राहत ५२ चेंडूंमध्ये ८० धावांची खेळी केली.
भारतीय संघासाठी केला विक्रम
रोहित व विराट यांनी ९४ धावांची भागीदारी करत भारतीय संघासाठी एक विक्रम केला. प्रथमच एकत्रितरित्या सलामीला उतरत असलेल्या जोडीने भारतासाठी केलेली ही सर्वाच्च भागीदारी होती. यापूर्वी, हा विक्रम रॉबिन उथप्पा व गौतम गंभीर यांच्या नावे होता. त्यांनी, २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकत्र पहिल्यांदाच सलामीला फलंदाजी करताना ७१ धावा ठोकल्या होत्या.
अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय या जोडीने २०१५ झिम्बाब्वे दौर्यावर प्रथमच सोबत सलामीला येत ६४ धावा जोडलेल्या. शिखर धवन व विराट कोहलीने देखील वेस्ट इंडिजविरुद्ध २०१७ मध्ये ६४ धावांची सलामी दिलेली. केएल राहुल आणि शिखर धवन यांनी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ६१ धावा काढल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेट इतिहासात प्रथमच आला ‘असा’ अजब योगायोग, दोन शहरात खेळले दोन भारतीय संघ
भारतीय संघाचा ‘अठरावा प्रताप’! अशी कामगिरी करणारा एकमेव संघ बनला भारत
विराटने सर केले विक्रमाचे आणखी एक शिखर, ‘या’ यादीत पोहोचला अव्वलस्थानी