Loading...

आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये भारताच्या ‘या’ खेळाडूंचा बोलबाला…!

काल (19 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात वनडे मालिकेतील अंतिम सामना पार पडला. हा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला असून मालिका 2-1ने जिंकली आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) उत्कृष्ट कामगिरी केली.

या वनडे मालिकेनंतर आयसीसीने आज वनडे क्रमवारीची यादी जाहीर केली आहे. या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत विराट पहिल्या क्रमांकावर आहे तर रोहित दुसर्‍या क्रमांकावर कायम आहेत.

या क्रमवारीत विराट आणि रोहित या दोन्ही खेळाडूंचे अनुक्रमे 886 आणि 868  गुण आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात विराट आणि रोहितने सामना आणि मालिका जिंकूण देण्यात मोलाची कामगिरी केली.

त्याचबरोबर शिखर धवन 7 स्थानांची झेप घेत 15 व्या क्रमांकावर आला आहे. तर केएल राहुल 21 स्थानांची प्रगती करत 50 व्या स्थानावर पोहचला आहे.

Loading...

तसेच या क्रमवारीत या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि कर्णधार ऍरॉन फिंचला (Aaron Finch) 1-1 स्थानाचा फायदा झाला आहे. वॉर्नर 7व्या क्रमांकावरून 6व्या क्रमांकावर आला आहे. तर फिंच 11व्या क्रमांकावरून 10व्या क्रमांकावर आला आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाकडून भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारा स्टिव्ह स्मिथनेही 4 स्थानांची प्रगती केली असून तो आता 23 व्या क्रमांकावर आला आहे. तसेच ऍलेक्स कॅरी 31 व्या स्थानावर आला आहे.

फलंदाजांबरोबरच गोलंदाजीतही भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजी क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 764 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे.

Loading...

तसेच, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) (737) आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू गोलंदाज मुजीब उर रेहमान (Mujeeb Ur Rahman) (701) गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या यादीत आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला (Kagiso Rabada) (684) एका गुणाचा फायदा होऊन तो चौथ्या क्रमांकावर आहे. परंतु यामध्ये  ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंसची (Pat Cummins) घसरण होऊन तो पाचव्या क्रमांकावर आला आहे.

या व्यतिरिक्त रविंद्र जडेजा 2 स्थानांनी पुढे येत 27 व्या स्थानी आला आहे. तर ऍडम झम्पाने 20 स्थानांची उडी घेत 37 वे स्थान मिळवले आहे.

Loading...

त्याचबरोबर अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत जडेजाने पहिल्या 10 क्रिकेटपटूंमध्ये स्थान मिळवले आहे. तो आता या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे. जडेजा व्यतिरिक्त पहिल्या 10 अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.

You might also like
Loading...