भारत आणि श्रीलंका (Ind vs SL Test Series) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका शुक्रवारी (४ मार्च) सुरू होईल. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जाईल. हा सामना विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी खास ठरणार आहे, कारण कसोटी कारकिर्दीतील त्याचा हा १०० वा सामना असेल. जर त्याने यामध्ये शतकी खेळी केली, तर स्वतःच्या १०० व्या कसोटीत शतक करणारा तो पहिला भारतीय खेळाडू असेल.
दुसरीकडे एक नकोसा विक्रमही त्याच्या नावावर होऊ शकतो. जागतिक क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी स्वतःच्या कारकिर्दीतील १०० व्या कसोटी सामन्यात शून्य धावा करून विकेट गमावली आहे. विराट कोहली मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. या सामन्यात त्याच्याकडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे, पण विराटला त्याच्या १०० व्या कसोटीत शून्यावर बाद होण्यापासून बचाव करावा लागणार आहे. यापूर्वी असा नकोसा विक्रम ७ खेळाडूंनी केला आहे.
आपण या लेखात जागतिक क्रिकेटमधील सात दिग्गजांचा विचार करणार आहेत, जे कारकिर्दीच्या १०० व्या कसोटी सामन्यात शून्य धावांवर बाद झाले होते.
१. दिलीप वेंगसरकर
भारताचे माजी दिग्गज फलंदाज दिलीप वेंगसरकर स्वतःच्या १०० व्या कसोटी सामन्यात शून्य धावांवर बाद होणारे पहिले खेळाडू होते. त्याने १९८८ साली न्यूझीलंडविरुद्ध स्वतःचा १०० वा कसोटी सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियममध्ये खेळला होता. यामध्ये भारतीय संघ १३६ धावांनी पराभूत झाला होता. वेंगसरकरांनी पहिल्या डावात २५, तर दुसऱ्या डावात शून्य धावा केल्या होत्या.
२. ऍलेन बॉर्डर
ऑस्ट्रेलियन संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज ऍलेन बॉर्डर यांनाही या नकोशा विक्रमाचा सामना करावा लागला होता. एप्रिल १९९१ मध्ये कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना वेस्ट इंडीजविरुद्ध खेळला होता. सामन्याच्या दुसऱ्या डावात बॉर्डर शून्य धावांवर बाद झाले. वेस्ट इंडीजने सामन्यात ३४३ धावांनी विजय मिळवला होता. तर मालिकेत ऑस्ट्रेलिया ३-१ अशा फरकाने पराभूत झाला होता.
३. कर्टनी वॉल्श
वेस्ट इंडीजचे महान खेळाडू कर्टनी वॉल्शने त्यांचा १०० वा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यांंनी या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या, पण फलंदाजी निराशाजनक केली होती. पहिल्या डावात त्यांनी तीन, तर दुसऱ्या डावात शून्य धावा केल्या होत्या. वेस्ट इंडीजने हा सामना शिवनारायन चंद्रपॉलच्या शतकी खेळीच्या जोरावर जिंकला होता.
४. मार्क टेलर
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता, जो ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये पार पडलेला. हा ऍशेस मालिकेतील एक सामना होता. टेलरने पहिल्या डावात ४६ धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात शून्य धावांवर विकेट गमावली होती. डॉमिनिक कॉर्कने टेलरला क्लीन बोल्ड केले होते. हा सामना अनिर्णीत राहिला होता.
५. स्टीफन फ्लेमिंग
न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार स्टीवर प्लेमिंगच्या नावावर देखील हा विक्रम आहे. त्यानी कारकिर्दीतील १०० कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध २००६ साली सेंचुरियनमध्ये खेळला होता. फ्लेमिंगच नाही, तर दक्षिण अफ्रिकेच्या शॉन पोलक आणि जॅक कॅलिस याचाही हा १०० वा कसोटी सामना होता. सामन्यात प्लेमिंग शून्य धावांवर बाद झाले होते आणि दक्षिण अफ्रिका संघ १२८ धावांनी जिंकला होता.
६. ऍलिस्टर कुक
इंग्लडचा माजी दिग्गज कर्णधार ऍलिस्टर कुक कसोटी कारकिर्दीत ९ वेळा शून्य धावांवर बाद झाला. यापैकी एकदा तो स्वतःच्या १०० व्या कसोटी सामन्यातही शून्यावर बाद झाला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेतील एका सामनाच्या दुसऱ्या डावात रेयान हॅरिसने कुकला शून्यावर बाद केले होते. इंग्लंडला या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. ही मालिका ऑस्ट्रेलियाने ५-० ने जिंकली होती.
७. ब्रेंडन मॅक्युलम
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि तुफानी फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम देखील त्याच्या १०० व्या कसोटी सामन्यात शून्य धावांवर बाद झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१६ मध्ये खेळला गेला होता. सामन्याच्या पहिल्या डावात मॅकुलमला ऑस्ट्रेलियाच्या जोश हजलवुडने शून्य धावांवर तंबूत पाठवले होते. दुसऱ्या डावात त्याने १० धावा केल्या होत्या. न्यूझीलंड संघाने ५२ धावांनी पराभव पत्करला होता.
महत्वाच्या बातम्या –
चेल्सी फुटबॉल क्लब निघाला विक्रीला! रशियन संघमालकाचा सत्कार्यासाठी निर्णय
“कधी वाटले नव्हते १०० कसोटी खेळेल”; ऐतिहासिक सामन्याच्या पूर्वसंध्येला विराट झाला व्यक्त
‘जे खेळाडू आयपीएल खेळत नाही, त्यांना राष्ट्रीय संघात संधी मिळत नाही’, भारतीय गोलंदाजची खंत